सातारा : सैन्य दलात भरती करतो, असे आमिष दाखवून दोन भावंडांना ३ लाख ७० हजारांचा गंडा घालणाऱ्या सैन्य दलातील जवानाला सातारा तालुका पोलिसांनी पुण्यातून अटक केली. प्रदीप विठ्ठल काळे (वय २८, रा. कोळे, ता. कराड), असे पोलिसांनी अटक केलेल्या सैन्य दलातील जवानाचे आहे.याबाबत रितेश नितीन जाधव (रा. नेले, ता. सातारा) याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे हा सैन्य दलात जीएनआर गनर या पदावर कार्यरत होता. मात्र, दोन महिन्यांपासून तो कर्तव्यावर गैरहजर आहे. त्याने रितेश जाधव व त्याच्या भावाला सैन्यात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून ३ लाख ७० हजार रुपये घेतले होते. हे पैसे या भावंडांनी ऑनलाइन, तसेच आरटीजीएसद्वारे काळे याच्या बँक खात्यावर वर्ग केले. पैसे दिल्यावर भरतीबाबत त्याला विचारणा केली असता, तुमचे काम सुरू आहे. दोन दिवसांत तुमचे मेडिकल पत्र येईल. तुम्हाला पुणे येथे आर्मी मेडिकलसाठी घेऊन जातो, असे सांगत राहिला. त्यानंतर थोडे दिवस गेल्यानंतर आरोपी प्रदीप याने फोन उचलणे बंद केले. त्याच्या घरी संपर्क केला असता घरच्यांनी तुम्ही व प्रदीप पाहून घ्या, असे उत्तर दिले. आरोपी प्रदीपबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने रितेश जाधव व त्याच्या भावाचा नंबर ब्लाॅक लिस्टला टाकला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे रितेश याच्या लक्षात आले. यानंतर त्याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपी प्रदीप काळे हा पुण्यात असल्याचे समजल्यानंतर पोलिसांचे पथक पुण्याला गेले. तेथून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.त्याने यापूर्वीदेखील कोळे, ता. कराड येथील एका युवकाची नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली आहे. त्याबाबत कराड तालुका पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होता. आरोपी प्रदीप काळे याने अजून काही युवकांना फसवले असल्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या युवक व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या जिल्ह्यातील आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी, असे अवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे, हवालदार संदीप आवळे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, विद्या कुंभार, राजू शिखरे, शिवाजी वायदंडे, दादा स्वामी, प्रदीप मोहिते, संदीप पांडव यांनी ही कामगिरी केली.