शेडगेवाडीत भेसळयुक्त दूध जप्त
By Admin | Updated: April 3, 2015 00:43 IST2015-04-02T23:12:32+5:302015-04-03T00:43:43+5:30
पाळत ठेवून छापा : अन्न व औषध विभागाची कारवाई

शेडगेवाडीत भेसळयुक्त दूध जप्त
सातारा : भेसळयुक्त दूध तयार करीत असल्याच्या संशयावरून वडूजजवळ शेडगेवाडी (ता. खटाव) येथील जय हनुमान संकलन केंद्रावर अन्न व औषध विभागाने पाळत ठेवून बुधवारी (दि. १) छापा टाकला. या छाप्यात केंद्रातील ७ हजार ८७५ रुपये किंमतीचा भेसळयुक्त दूध व भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये म्हशीचे दूध, मिश्र दुध, रिफाईन्ड सोयाबीन तेल, ड्राईड ग्लुकोज पावडर व आयात केलेले रिफाईन्ड पाम कर्नल आॅईल या वस्तूंचा समावेश असून, हे पदार्थ तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यापैकी म्हशीचे ३८ लिटर दूध व १५८ लिटर मिश्र दूध नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आले. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) आर. एस. बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी एस. बी. अंकुश, यू. एस. लोहकरे, डी.एस. साळुंखे, आय. एस. हवालदार, एम. एस. पवार यांच्या पथकाने केली. या केंद्राचे मालक रंगनाथ राजाराम मोहिते यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. भेसळीचे पदार्थ कोठून आणले तसेच या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)