सौरऊर्जा दिव्यांचा बाजार!
By Admin | Updated: August 9, 2015 21:06 IST2015-08-09T21:06:26+5:302015-08-09T21:06:26+5:30
ग्रामपंचायती अंधारात : बॅटऱ्या चोरीस, प्रत्येकी २५ हजार पाण्यात

सौरऊर्जा दिव्यांचा बाजार!
पाटण : तालुक्यात २४१ ग्रामपंचायती व ४४८ वाड्या-वस्त्या असून, जंगलानी वेढलेल्या तालुक्यातील अनेक गावे दुर्गम आहेत. त्यामुळे या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे दिव्यांना खूप महत्त्व आहे. मात्र, तालुक्यातील सौर दिव्यांच्या योजनेत मोठा गोलमाल झाला असून, अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत बसविलेले सौर दिवे बंद स्थितीत आहेत. बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत. एका सौरऊर्जा दिव्याच्या संचासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च झाला आहे.स्मशानभूमी, गावातील सार्वजनिक ठिकाणे किंवा पिण्याच्या पाण्याचे पाणवठे या ठिकाणी सौर दिवे बसविण्याची योजना अत्यंत उपयोगाची होती. त्यानुसार डोंगराळ व दुर्गम भागातील गावांना गरजेनुसार सौर दिवे देण्यात आले होते. हे दिवे बसविण्याचे काम फत्ते झाले असेल; मात्र काही दिवसांतच या दिव्यांच्या बॅटऱ्या, बल्ब चोरून नेणारी यंत्रणा सज्ज झाली. बघता-बघता शेकडो दिव्यांचे सािहत्य चोरीस गेले. त्यामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसविण्यात आलेले दिवे बंद आहेत. हे प्रकार दिसायला किरकोळ दिसत असले तरी यामागे लाखोंचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
पांढरेपाणीतील योजना पाण्यात...
चांदोली व कोयना अभयारण्यालगत वसलेल्या पाटण तालुक्यातील पांढरेपाणी या अतिदुर्गम गावात स्वातंत्र्यानंतर २०१० सालापर्यंत विजेची सोय नव्हती. तेथील लोक अंधाराचा सामना करत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांना सामोरे जात होते. त्यासाठी तेथे प्रत्येकी घर व दारात लाखोंची सौर दिवे योजना बसविण्यात आली. संबंधित एजन्सीने या कामात हलगर्जीपणा करून लाखो लाटले. काही दिवसांतच ही योजना बंद पडली. सौर योजनेचे साहित्य घरोघरी पडून आहे.
सौर दिव्यांबाबत नुकत्याच झालेल्या पाटण पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार यांनी विषय मांडला. त्यावर ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे काढण्यात आले. आता गावनिहाय सौर दिव्यांची काय परिस्थिती आहे, याची चौकशी होणार आहे.
पाटण तालुक्यातील अनेक गावांत सौर पथदिवे बसविण्यात आले होते. मात्र सध्या अनेक पथदिवे बंदस्थितीत आहेत. काही गावांतील पथदिवे खांबासहीत चोरीस गेलेले आहेत. शाळा, स्मशानभूमी, दवाखाने व चावडीजवळील असे सौर पथदिवे उपयोगी ठरत होते. त्यामुळे या सौर पथदिव्यांचा फायदा खूप महत्त्वाचा होता. मात्र, देखभाल नसल्यामुळे जवळपास सर्वच पथदिवे बंद आहेत. त्याची चौकशी व्हावी.
- धोंडिराम अवघडे, किल्ले मोरगिरी