समाजसेवक चोरट्याकडून ६३ तोळे सोने हस्तगत !

By Admin | Updated: June 7, 2016 07:34 IST2016-06-06T23:17:16+5:302016-06-07T07:34:27+5:30

-चोऱ्या करुन समाजसेवा...!--१४ घरफोड्या उघडकीस : शिरवळ पोलिसांची कामगिरी

Social worker gets 63 tons gold from thieves! | समाजसेवक चोरट्याकडून ६३ तोळे सोने हस्तगत !

समाजसेवक चोरट्याकडून ६३ तोळे सोने हस्तगत !

शिरवळ : बंद लग्न घरांना व एकांतात असणाऱ्या घरांना लक्ष्य करत, टीव्ही मालिकेतील घटनांपासून प्रेरणा घेत समाजसेवेचा बुरखा पांघरलेल्या एका समाजसेवी व पुणे येथील नियोजन मंडळाच्या माजी सदस्य असलेल्या चोरट्याचा म्हणजेच ‘वन मॅन आर्मीचा’ बुरखा फाडण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे.
विशेष म्हणजे संबंधित चोरट्याने सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. भारत प्रकाश अधिकारी (वय ३८, रा. आतकरवाडी, माहूर, ता. पुरंदर, जि. पुणे) असे या चोरट्याचे नाव आहे. शिरवळ, खंडाळा, भुर्इंज, वाई, राजगड व पुणे जिल्ह्यातील राजगड, भोर येथे सुमारे १४ घरफोड्या उघडकीस आणत पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ६३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कवठे, ता. खंडाळा येथील लग्न घर असलेल्या बंद घरामध्ये बुधवार, दि. ०१ रोजी चोरीचा प्रयत्न करीत असताना कवठे ग्रामस्थांनी थरारक पाठलाग करत भारत अधिकारी याला रंगेहाथ पकडत शिरवळ पोलिसांच्या ताब्यात
दिले होते. यावेळी शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश खरात यांच्यासह पोलिस पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच भारत अधिकारी याने पोपटासारखे तोंड उघडले.
शिरवळ येथील ज्ञानदीप को-आॅपरेटिव्ह सोसायटीमधील काऊंटरवरून ३८ हजार १०० रुपये, विंग येथील ५२ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने. पळशी, भाऊनगर येथील ८७ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, अतिट (ता. खंडाळा) येथून १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम ४० हजार रुपये, वडगाव पोतनीस येथील ४० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरजणे येथील घर फोडून ९ तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने, भुर्इंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेळे येथून साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, तसेच पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किकवी येथून घरातून सुमारे २ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन तोळे सोन्याचे दागिने पानवळ, ता. भोर येथून ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, करंजे (ता. भोर) येथून ३३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घरफोडी करत लुटल्याचे कबूल केले.
एकूण १४ घरफोड्यांमधून शिरवळ पोलिसांनी तब्बल ६३ तोळे सोन्या-चांदीचे दागिने भारत अधिकारी याच्याकडून हस्तगत केले. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शिरवळ पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या भारत अधिकारी हा न्यायालयीन कोठडीत आहे. घटनेची नोंद शिरवळ
पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश खरात हे करीत आहे. (प्रतिनिधी)

चोऱ्या करुन समाजसेवा...!

भारत अधिकारी हा चोऱ्या करून चोरीच्या पैशातून माहूर येथील व परिसरातील गावांना स्वागत कमानी, रस्ते, गणेश मंडळांना साहित्य वाटप, संगणक वाटप, मंदिरांना देणग्या, पटांगण सुशोभीत करण्यासाठी रक्कम देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गोष्टीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे माहूर येथील एका शाळेला चोरीच्या पैशातून स्वत: च्या मुलाच्या नावाने दिलेली संगणक शाळा ही पूर्णपणे वातानुकूलित असून, संपूर्ण कक्षात एसी बसविण्यात आले आहे. यासाठी त्याने तब्बल तीन लाखांहून अधिक खर्च केल्याची चर्चा आहे.

Web Title: Social worker gets 63 tons gold from thieves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.