कोरोनाच्या लढाईत सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:16+5:302021-08-14T04:44:16+5:30

सातारा : गेली दीड-दोन वर्षे आपण कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शासनही आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देत आहे. ...

Social organizations should take the lead in the battle of Corona | कोरोनाच्या लढाईत सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा

कोरोनाच्या लढाईत सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा

सातारा : गेली दीड-दोन वर्षे आपण कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शासनही आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देत आहे. तज्ज्ञ व्यक्ती तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. या कोरोना लाटेच्या मुकाबल्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

येथील स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील बाल कोविड अतिदक्षता विभागाचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पद्मश्री लक्ष्मण माने, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, आरोग्य सेवा पुणे परिमंडलचे डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी लॉकडाऊन लावला यामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला. तरीही शासनाने राज्य आर्थिक बजेट कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च केले. पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. ही संख्या का कमी होत नाही याचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी एक तज्ज्ञ लोकांचे पथक तयार करावे. कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, तसेच आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम केले. यापुढेही अशा पद्धतीने चांगले काम करतील, असा विश्वासही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लहान मुले उपचारापासून वंचित राहणार नाहीत याची जिल्ह्यात तयारी करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाने निर्बंधामधून शिथिलता दिली आहे. यामुळे अधिकची काळजी घेतली पाहिजे. कोणालाही कोरोनाची लक्षण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

बाल कोविड अतिदक्षता विभागास मदत करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बाल कोविड कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Social organizations should take the lead in the battle of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.