सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:32+5:302021-03-19T04:38:32+5:30
सातारा : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी शासन विविध माध्यमांचा ...

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी
सातारा : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर करुन प्रसिद्धी करीत आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एलईडी व्हॅनच्या माध्यमातून योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. या योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रसिद्धी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. या व्हॅनला पालकमंत्री पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून कोरोनापासून कसा बचाव करावा याचीही माहिती देण्यात येणार आहे. शासनाने व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करुन सहकार्य करावे असे सांगून हा जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाला शुभेच्छाही पालकमंत्री पाटील यांनी शेवटी दिल्या.
फोटो ओळ : सातारा येथे समाज कल्याणच्या योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॅनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.