मातीची चोरटी वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST2021-03-19T04:39:21+5:302021-03-19T04:39:21+5:30
फलटण : टाकळवाडा (ता. फलटण) येथे मातीची चोरटी वाहतूक करणारा डंपर फलटण तहसीलदार यांच्या पथकाने थांबविला असता ...

मातीची चोरटी वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल
फलटण : टाकळवाडा (ता. फलटण) येथे मातीची चोरटी वाहतूक करणारा डंपर फलटण तहसीलदार यांच्या पथकाने थांबविला असता त्यांना हुलकावणी देऊन चालक पसार झाला असून, तिघाजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. १६ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास निंबळक-टाकळवाडा (ता. फलटण) गावचे हद्दीत रस्त्यावर डंपर (एमएच १३ एएक्स ३९८४) हा माती भरून घेऊन जात असताना फलटण तहसीलदार यांच्या पथकाने थांबविला असता डंपरवरील चालक वाहनात गौण खनिज अनधिकृतपणे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चालक पप्पू रजपूत (पूर्ण नाव माहीत नाही) (रा. जावली, ता. फलटण, जि. सातारा) याने डंपर हा चालूस्थितीत रस्त्याने खाली करीत वाहन मुळीक वस्ती येथे लावून पळून गेला. डंपरसोबतचा समीर दिनकर गावडे (रा. टाकळवाडा, ता. फलटण, जि. सातारा) याने डंपर हा कुणाल झगडे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. कटफळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याकडून चालविण्यास घेतला असल्याचे सांगितले. डंपरमालक कुणाल झगडे हा डंपरसह निंबळक फाटा येथून बरड (ता. फलटण) दिशेने हुलकावणी देऊन तेथून पंढरपूर रोडने पळून गेला .त्याचा पाठलाग केला असता तो सापडला नाही. याबाबत वरील तिघाजणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.