डोळ्यात धूर...पोटात आग!
By Admin | Updated: January 5, 2015 00:40 IST2015-01-04T21:24:51+5:302015-01-05T00:40:55+5:30
शाळांना मिळेना सिलिंडर : आदर्कीतील परिस्थिती; पोषणआहार शिजविण्यासाठी लाकडांचा आधार

डोळ्यात धूर...पोटात आग!
सूर्यकांत निंबाळकर- आदर्की -ज्या ठिकाणी वृक्षारोपणाचे धडे दिले जातात, तेथेच पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्यामुळे ठेकेदारांना चक्क लाकडांचा उपयोग करून पोषण आहार शिजवावा लागत आहे.
त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वेळेवर आहार मिळत नसल्याने डोळ्यात धूर अन् पोटात आग पडत असल्याचे दृश्य येथील अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दिसून येत आहे.
शासनाच्या वतीने २० ते ३० वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दूध तापवून देण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शाळेतील पट टिकून राहू लागला. याचा विचार करून प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना कोरडा तांदूळ देण्यास सुरुवात केली. परंतु त्यामध्ये अपहार होवू लागला. शाळेतील पटावर परिणाम होऊ लागल्याने पोषण आहाराची व्याख्या बदलून मध्यान्य भोजन म्हणून शाळेतच सर्व पालेभाज्या, पदार्थ, तांदूळ शिजवून देऊ लागल्यामुळे पटसंख्येत वाढ झाली. त्यावेळी मुख्याध्यापकच सर्व साहित्य खरेदी करीत होते. त्यानंतर मुख्याध्यापकांकडून कारभार काढून ठेकेदारांमार्फत साहित्य पुरवठा होऊ लागला. त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळू लागला. सर्व शाळेतील पोषण आहार महिला शिजवतात. पटसंख्येनुसार त्यांना या कामाचे मानदन दिले जाते.
असे असताना आदर्कीमधील अनेक शाळांना गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने शाळेत पोषणआहार चुलीवर शिजवला जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करून सरपणाचा वापर होत आहे. त्यामुळे वृक्ष वाचविण्यासाठी शासनाने शाळांना गॅसचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेच्या ३०३ शाळांपैकी २५० शाळेत गॅस उपलब्ध आहे. बाकी शाळेत शैक्षणिक उठाव, लोकवर्गणीतून गॅस कनेक्शन घेणार असून तशी मागणी शाळेतून येऊ लागली आहे.
-संजय धुमाळ,
गटशिक्षण अधिकारी
पर्यावरणाचा होतोय ऱ्हास
पोषण आहार अंमलात येऊन तीस वर्षे झाली तरीही अनेक शाळेत गॅस उपलबध नाहीत. त्यामुळे जेथे वृक्षारोपणाचे महत्त्व शिकवले जाते, तेथेच विद्यार्थ्यांना वृक्षाची कत्तल करून पोषण आहार देण्यात येतो.
ज्या शाळेत पोषणआहार सरपणावर शिजवला जातो, त्या शाळेत धुरापासून विद्यार्थी व शिजविणाऱ्या महिलेस त्रास होतो, शिवाय पर्यावरणाचा ऱ्हासही होतो.