गणेशखिंड पठारावर महिना अगोदर फुलते स्मितीया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:14+5:302021-09-05T04:44:14+5:30
पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर सप्टेंबर महिन्यात येऊन संपूर्ण पठारावर पिवळसर झालर पसरवणाऱ्या स्मितीया फुलाची मध्यम स्वरुपाची लवकर ...

गणेशखिंड पठारावर महिना अगोदर फुलते स्मितीया!
पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर सप्टेंबर महिन्यात येऊन संपूर्ण पठारावर पिवळसर झालर पसरवणाऱ्या स्मितीया फुलाची मध्यम स्वरुपाची लवकर येणारी प्रजाती दरवर्षी कास पठाराच्या एक महिना अगोदर गणेशखिंड पठारावर फुलते. गणेशखिंडीत बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळणाऱ्या पिवळ्या धम्मक फुलांचा गालिचा पर्यटकांचे लक्ष वेधत आहे.
सह्याद्री रांगा परिसरात फुलांच्या अनेक प्रजाती असून, आसपासच्या परिसरात नवनवीन फुले दिसतात. सर्वत्रच जनावरांचे प्रमाण कमी झाल्याने गवताचे प्रमाण वाढल्याने या गवताखाली दडलेली फुले दिसत नाहीत. तापमान, पाऊस, उष्णता जास्त, माती उष्ण अशा ठिकाणी फ्लॉवरिंग जास्त आढळते.
साताऱ्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावरील गणेशखिंड पठार समुद्रसपाटीपासून आठशे-साडेआठशे मीटर उंचीवर आहे. कास पठार समुद्रसपाटीपासून १२४० मीटर उंचीवर आहे. स्मितीयाच्या एकूण सहा जाती आहेत. कास पठारावरील स्मितीया बेगेनिमाचे फूल मोठ्या आकाराचे असून, ते फूल इतर ठिकाणी दिसत नाही. गणेशखिंड परिसरात येणारी स्मितीयाची मध्यम स्वरुपाची जात असून, स्मितीयाचे जे फूल पठारावर येते ते खाली कोठे येत नाही व खाली येणारे फूल वर येत नाही.
कास पठारावरील स्मितीया उमलण्याअगोदर एक महिना अगोदर गणेशखिंड पठारावर येते. जवळजवळ २० ते २५ खाली दिसणाऱ्या फुलांच्या प्रजाती कास पठारावर दिसत नाहीत. त्या प्रजाती गणेशखिंड पठारापासून व बामणोलीपासून कास पठारापर्यंत दिसतात. समुद्रसपाटीपासून आठशे-साडेआठशे मीटरवर उष्णता, तापमान, पाऊस अशा पोषक वातावरणामुळे स्मितीयाची मध्यम स्वरूपाची जात एक महिना अगोदर गणेशखिंड पठारावर बहुतांशी ठिकाणी गालिच्यामध्ये पाहायला मिळते.
(चौकट)
कास पठारावरील दुर्मीळ प्रदेशनिष्ठ स्मितीया!
स्मितीया बेगेमीना वनस्पती सह्याद्रीच्या रांगामध्ये अनेक ठिकाणी येते. महाबळेश्वर, पाचगणी, कास, वाघासडा याठिकाणी उंच भागावर येणारे हे पिवळसर रंगाचे फुल वेगळे, मोठे आहे. सप्टेंबर महिन्यात पाने, वेल दिसतात. पाने, फांदीवर चिंचेच्या पानाप्रमाणे एकसारखी जमिनीवर जणू काही गोधडी पांघरल्याप्रमाणे दिसतात. फुले हसत असणाऱ्या मुलांप्रमाणे तसेच कार्टून, मिकी माऊससारखे दिसते. स्मीत म्हणजे हसत हसत येणारे म्हणून स्मितीया म्हणतात. यामध्ये लहान तीन व मोठ्या तीन जाती आहेत. यापैकी कास पठारावर फुलणारी स्मितीया आगरकरी ही दुर्मीळ, वेगळी जात आहे.
(कोट)
तांबडा, लाल, गुलाबी, पांढरा अशा रंगामध्ये दिसणारे स्मितीयाचे संशोधन केंद्र बेंगलोरला असून, कास परिसरात बॉटनिस्ट संशोधनासाठी नेहमी येतात. यंदाच्या हंगामात गणेशखिंडीजवळील मालकी क्षेत्रात स्मितीया ऊन, पाऊस, तापमान लवकर मिळाल्यानं पंधरा दिवस अगोदर दिसू लागले आहेत. काही ठिकाणी याला गोधडी, बरखा, कावळा, मिकीमाऊस, डोनाल्ड डक नावाने ओळखतात.
- श्रीरंग शिंदे, निवृत्त वनपाल, कास पठार
(छाया - सागर चव्हाण)