कोरड्या कोयनेत भरला ‘आठवणीतला बाजार’
By Admin | Updated: July 3, 2014 00:49 IST2014-07-03T00:41:17+5:302014-07-03T00:49:16+5:30
गावांचे अवशेष उघडे : बामणोली, शेंबडी परिसरात धरणापूर्वीच्या दिवसांना उजाळा

कोरड्या कोयनेत भरला ‘आठवणीतला बाजार’
बामणोली : जून महिनाही कोरडा गेल्यामुळं ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ मानल्या जाणाऱ्या कोयनेच्या शिवसागर जलाशयाची पातळी खूपच खालावली आहे. बामणोली परिसरातील जुन्या, पाण्याखाली गेलेल्या गावठाणांचे अवशेष उघडे पडले असून, पूर्वी कधीतरी ज्या ठिकाणी बाजार भरत होता, तिथेच मासेविक्रीसाठी विक्रेते बसत असल्यामुळे ‘आठवणीतला बाजार’ भरल्याचे दृश्य दिसत आहे.
कोयनेच्या धरणामुळं निर्माण झालेल्या विस्तीर्ण अशा शिवसागर जलाशयात आणखी दोन नद्यांची खोरी समाविष्ट आहेत. तापोळ्याजवळ सोळशी नदी कोयनेला मिळते, तर शेंबडी गावाजवळ कांदाटी आणि कोयनेचा संगम आहे. कोयनेत थोड्या प्रमाणात पाणी असले, तरी सोळशी आणि कांदाटी नद्या पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. सोळशी नदीच्या पात्रातून तापोळ्याला लोक चालत जाऊ शकत आहेत, इतकी पाण्याची पातळी खालावली आहे. लांबलेल्या पावसामुळं प्रत्येकजण निसर्गाच्या कृपेची वाट पाहत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, बामणोली-शेंबडी भागात भात पिकाला जीवदान मिळण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेबरोबरच जुन्या आठवणीही जागविल्या जात आहेत.
शिवसागर जलाशयाचं पाणी कमी झाल्यामुळं वीजनिर्मिती ठप्प झाली आणि नदीकाठच्या गावांत भाताची पिकंही पिवळी पडू लागली. शेतकरी हवालदिल होऊन पावसाची वाट पाहत आहेत. हा डोंगराळ टापू मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध आहे. यंदा जुलै उजाडूनही पावसाची चिन्हे नाहीत. मात्र, या परिस्थितीचा जलाशयाच्या जवळ वसलेल्या गावांना थोडा फायदाही झाला आहे. पाणी कमी झाल्यामुळं मासे मोठ्या प्रमाणावर मिळत असून, मुंबई-पुण्याकडे रोज मासे पाठविले जात आहेत. माशांच्या राशी रचून जिथं विक्रेते बसत आहेत, त्याच ठिकाणी जुन्या बामणोली गावचा बाजार बसत असे. धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच त्या ठिकाणी आता ‘आठवणीतला बाजार’ भरत आहे.
बामणोली गावात देशपांडे आडनावाच्या कुटुंबांची घरे जास्त होती. ब्राह्मण समाजातील इतरांचीही बरीच घरे होती. त्यामुळेच गावाला ‘बामणोली’ नाव पडल्याचं सांगितलं जातं. महात्मा गांधींच्या हत्येनंतर उद््भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर १९४८ मध्ये देशपांडे व अन्य ब्राह्मण कुटुंबांनी सांगली, मिरज, कुपवाडकडे स्थलांतर केलं. कालांतरानं कूळ कायद्यान्वये जमिनी वहिवाटदारांना मिळाल्या. आजही म्हावशी, बामणोली, सावरी गावांत काही जमिनींच्या सातबारावर देशपांडे आणि अन्य कुटुंबीयांची नावे आहेत, असं ग्रामस्थ सांगतात. कोयना धरण झाल्यावर बामणोली गावठाण पाण्यात गेलं आणि जलाशयाच्या कडेला नवीन बामणोली गाव वसलं. आता पाणी आटल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. (वार्ताहर)