उसाला खत देण्यासाठी शेतकऱ्यांनी विकसित केली स्मार्ट पहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:12 PM2018-12-11T12:12:49+5:302018-12-11T12:14:22+5:30

ग्रासरूट इनोव्हेटर : भिलकटीमधील काही शेतकऱ्यांनी पहारीमध्ये गरजेनुसार बदल करून त्याचा उपयोग सुरू केला आहे.

Smart Pahar developed by farmers to give sugarcane fertilizer | उसाला खत देण्यासाठी शेतकऱ्यांनी विकसित केली स्मार्ट पहार

उसाला खत देण्यासाठी शेतकऱ्यांनी विकसित केली स्मार्ट पहार

- विकास शिंदे (मलटण, जि. सातारा)

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ऊस उत्पादकांचा प्रदेश. या भागात ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी विविध प्रयोग होत असतात. अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात उसाला खत देण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर होऊ लागला आहे. भिलकटी, चौधरवाडी, वडजल या परिसरात उसाला खत देण्यासाठी विशिष्ट पहारीचा वापर होताना दिसत आहे. गरज शोधाची जननी असते, या पद्धतीनेच भिलकटीमधील काही शेतकऱ्यांनी पहारीमध्ये गरजेनुसार बदल करून त्याचा उपयोग सुरू केला आहे.  पूर्वी उसाला खत देताना ते वरूनच फिसकटले जायचे किंवा पाण्यातून सोडण्यात येत असे. अनेक वेळा हे खत हव्या त्या प्रमाणात उसाच्या मुळापर्यंत पोहोचतच नव्हता.

यातूनच शेतकऱ्यांनी उसाच्या बुडख्यात पहारीच्या साह्याने खड्डा घेऊन खत देण्यास सुरुवात केली आणि आणखी उत्पादन वाढीसाठी याचा फायदा झाला. फलटण तालुक्यातील वडजल, भिलकटी, चौधरवाडीमधील शेतकऱ्यांनी मूळ पहारीचे वजन कमी करून आता ती पोकळ पाईपपासून बनविली आहे. त्यामुळे वापर करताना ती आणखी सुलभ झाली आहे. या पहारीला वरती आडवा हँडल बसविला गेला. त्यामुळे कमी ताकद लावून उसाच्या बुडाख्यात छिद्र घेणे आणखी सोपे झाले आहे. दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पहारीमध्ये शेतकऱ्यांनी स्वत: अनेक बदल करून हे नवे यंत्र बनविले. या पहारीला खालील बाजूने टोकदार बनवत ती वापरास अधिक सुलभ केली गेली. काही शेतकऱ्यांनी या पहारीला पायाने दाबण्याचे पॅडेलही बसविले आहे. अगदी शंभर ते दीडशे रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी याचा शोध लावला आहे. तालुक्यात उसाला बुडख्यात खत घालून देणाऱ्या मजुरांच्या टोळ्याही आल्या आहेत. ही पहार लोकांना रोजगार मिळवून देत आहे.

Web Title: Smart Pahar developed by farmers to give sugarcane fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.