सुस्त प्रशासनाला लहानग्यांची चपराक
By Admin | Updated: December 11, 2014 23:52 IST2014-12-11T21:41:20+5:302014-12-11T23:52:39+5:30
वाईत अभियान : दुर्गंधी निर्मुलनासाठी नेचर्स फ्रेंडस् ग्रुप सरसावला

सुस्त प्रशासनाला लहानग्यांची चपराक
वाई : कचरा साचल्याने येणारी दुर्गंधी, मैलामिश्रीत सांडपाण्याने आरोग्यास धोका, नागरिकांच्या तक्रारी हे सर्व काही प्रशासनाने दुलक्षित केले. अखेर लहानग्यांनी हातात झाडू घेऊन प्रशासनाला लाजविले.
वाई-पाचगणी रस्त्याशेजारील सायली कुंज इमारतीशेजारील मोकळ्या जागेत कचरा साठल्याने कचरा डेपोचे स्वरुप येऊन मैला मिश्रित व सांडपाणी सोडल्याने परिसरात घाण होऊन दुर्गंधी पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.
मुख्य रस्त्यावरून महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता असून हजारो विद्यार्थी या रस्त्याने जा-ये करीत असतात. ज्येष्ठ नागरिकही या रस्त्याने पाचगणी घाटाकडे फिरायला जात असतात. तसेच या परिसरात खासगी क्लासेस आहेत. या सर्वांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिसरातील लोकांनी प्रशासनाला निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, असे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
नेचर्स फ्रेंडस् गु्रपच्या लहानग्यांना ही बाब लक्षात आल्याने आपल्याच परिसरातील घाणीचे उच्चाटन करण्यासाठी हाती झाडू घेतला व स्वच्छता करायला सुरुवात केली. नेचर्स ग्रुपमध्ये दत्त तसेच सायली कुंजमधील सदस्य असून ते प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात स्वच्छता अभियान करीत असतात.
त्यांनी प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात स्वच्छता करण्याचा मानस बोलून दाखविला. अभियानात शीतल काळे, सई जेबले, चेतल काळे, रितेश खामकर, ओंकार केंजळे, श्रुती पोवळे, रचना भोसले, आदित्य पोवळे इत्यादी सदस्यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
स्वच्छतेचा संस्कार अगदी लहान वयातच होणे आवश्यक असते. आजच्या नव्या पिढीचे कसे होणार?, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना या मुलांनी चांगलीच चपराक दिली आहे. लहानग्यांना जे कळते, ते मोठ्यांना कळत नाही. या लहानग्यांकडून सर्वांनी स्वच्छतेचे संस्कार शिकावेत, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
आम्ही स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरणा घेऊन आपला परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केला आहे.
श्रुती पोवळे
(सदस्य, नेचर्स फ्रेंडस् ग्रुप)
ल्ल ल्ल ल्ल
आम्ही ‘लोकमत’मध्ये आलेले वृत्त पािहले व आपल्याच परिसरातून स्वच्छतेला सुरुवात करण्याचे ठरवले. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ केला तरच स्वच्छ भारत होणार आहे.
रितेश खामकर,
सदस्य नेचर्स फ्रेंडस् ग्रुप
वाई येथील नेचर्स फाउंडेशनच्या चिमुकल्यांनी स्वच्छता मोहीम राबविल्याणामुळे एरवी रस्ता चकाचक झाले होते.