वाईत घुमला ‘जय शिवराय’चा नारा
By Admin | Updated: April 22, 2015 00:29 IST2015-04-21T22:44:03+5:302015-04-22T00:29:21+5:30
शिवजयंती उत्साहात : शिवज्योतीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत

वाईत घुमला ‘जय शिवराय’चा नारा
वाई : शिवजयंतीनिमित्त वाई तालुक्यासह शहरातील शिवभक्तांनी प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, रायरेश्वर, पुरंदर, राजगड, तोरणा अशा किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीचे वाईतील शिवाजी चौकात मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले़ शहरातील प्रत्येक चौकात शिवभक्तांनी फ्लेक्स बोर्ड, स्वागत कमानी, रस्त्यांवर दुतर्फा भगवे झेंडे लावल्याने संपूर्ण शहरात शिवमय वातावरण झाले होते़ वाईच्या शिवाजी चौकात शिवसेनेचे आप्पा शिंदे, सागर मालुसरे, संदीप जायगुडे, बंडू शिंगटे व शिवभक्त येणाऱ्या प्रत्येक ज्योतीचे हार घालून व तेल वाहून स्वागत करीत होते़ शहरातील रविवार पेठेतील शिवजयंती मडंळ, वाई तालुका श्री छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळ, गंगापुरी शिवजंयती मंडळ, सोनगिरवाडी शिवजयंती मंडळ, सिद्धनाथवाडी शिवजयंती मंडळ, मेणवली शिवजयंती मंडळ, व शेंदुजणे शिवजयंती मंडळ या मंडळांच्या ज्योतींनी वाईतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
रविवारपेठेतील सर्व शिवजयंती उत्सव मंडळांच्या ज्योतींचे हिंदू व मुस्लीम बांधवांनी स्वागत करून शिवप्रतिमेचे पूजन करून हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश दिला़ (प्रतिनिधी)
पुसेसावळीत मिरवणूक
पुसेसावळी : येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे समािधस्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथून शिवज्योत आणण्यात आली. सुमारे ७० युवकांनी यात सहभाग घेतला होता. पुसेसावळीसह परिसरातील अनेक गावांमध्ये शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पुसेसावळीत शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंगळवार, दि. २१ रोजी सायंकाळी मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे.