‘व्यर्थ ना हो बलिदान, चलो बचाएँ संविधान’ काँग्रेसचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST2021-09-06T04:44:01+5:302021-09-06T04:44:01+5:30
वडूज : ‘देशासाठी बलिदान देण्याची परंपरा जोपासणारा काँग्रेस पक्षच हुतात्म्यांचा पक्ष आहे. केंद्र सरकारची हुकूमशाही मोडीत काढून संविधान ...

‘व्यर्थ ना हो बलिदान, चलो बचाएँ संविधान’ काँग्रेसचा नारा
वडूज : ‘देशासाठी बलिदान देण्याची परंपरा जोपासणारा काँग्रेस पक्षच हुतात्म्यांचा पक्ष आहे. केंद्र सरकारची हुकूमशाही मोडीत काढून संविधान वाचविण्यासाठी व स्वातंत्र्यसंग्रामासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘व्यर्थ ना हो बलिदान, चलो बचाएँ संविधान’ या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मानगरी वडूज येथे केले आहे,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
येथील फिनिक्स ऑर्गनायझेशन सभागृहात ९ सप्टेंबर हुतात्मा दिन कार्यक्रमाच्या नियोजनपर आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ॲड. विजयराव कणसे, मनोहर शिंदे, अशोकराव गोडसे, रजनीताई पवार, धनश्री महाडिक, डॉ. महेश गुरव, डॉ. विवेक देशमुख, बाबासाहेब माने, प्रा. विश्वंभर बााबर, झाकीर पठाण, विराज शिंदे, प्रताप देशमुख, अजित ढोले, अन्वर पाशाखान, संजीव साळुंखे, भरत जाधव उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षाचे औचित्याने काँग्रेसच्या वतीने देशभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. १९४२ ला मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांनी जुलमी इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला. देशभर सत्याग्रह चळवळीत मोर्चे, पदयात्रा, झेंडा फडकविणे आंदोलने सुरू झाली. आंदोलनाचा भाग म्हणून वडूज मामलेदार कचेरीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला होता. मोर्चावर झालेल्या गोळीबारात खटाव तालुक्यातील नऊ स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील वडूजचा हुतात्मा मोर्चा हे एक सोनेरी पान आहे. तो हुतात्मा दिन म्हणजे ९ सप्टेबर १९४२ चा दिवस होता. या मोर्चाच्या स्मृती जागवण्यासाठी व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.’
स्वागताध्यक्ष रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्यातील अकरा तालुके व पंधरा ब्लाॅक कमिटी यांच्या संयोजनामार्फत प्रत्येक तालुक्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून वडूजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. जयराम स्वामी वडगाव (ता. खटाव) येथील हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या जन्मभूमी ते हुतात्मा भूमी वडूजपर्यंत ३०० काँग्रेस कार्यकर्ते हुतात्मा ज्योत घेऊन दौड करणारे आहेत.’
राजेंद्र शेलार यांनी प्रास्तविक केले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी आभार मानले.
चौकट
राज्य पातळीवरील नेत्यांची उपस्थिती
दि. ९ सप्टेंबर रोजी हुतात्मा अभिवादन व स्वातंत्र्यसैनिक सत्कार समारंभास काँग्रेस कमिटीचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, सहप्रभारी व सचिव सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित राहणार आहेत.
फोटो ०५वडूज हुतात्मा
वडूज (ता. खटाव) येथे रविवारी आयोजित बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रणजितसिंह देशमुख, डॉ. सुरेश जाधव, विजयराव कणसे उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)