आठ ट्रक झाडांची कत्तल बेकायदेशीरच

By Admin | Updated: August 9, 2016 23:52 IST2016-08-09T23:39:00+5:302016-08-09T23:52:51+5:30

पिंपळ, वडावरही कुऱ्हाड : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे, कारवाई न झाल्यास हरित लवादाकडे तक्रार; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

The slaughter of eight truck trees is illegal | आठ ट्रक झाडांची कत्तल बेकायदेशीरच

आठ ट्रक झाडांची कत्तल बेकायदेशीरच

राहुल तांबोळी- भुर्इंज --‘आसले, ता. वाई गावच्या हद्दीतील धोम पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत करण्यात आलेली शेकडो झाडांची कत्तल बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आले असून, या कत्तलीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आतापर्यंत सुमारे ८ ट्रक भरून येथे वृक्षतोड झाली असून विशेष म्हणजे वड, पिंपळ, देशी लिंब अशा पुरातन झाडांवरही निर्दडपणे कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. खासगी झाडे तोड ठेकेदार आणि स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून केलेल्या या वृक्षतोडप्रकरणी कारवाई न झाल्यास हरित लवादाकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार आहेत,’ असा इशारा आसले विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण यांनी दिला आहे.
१९७२ मध्ये पुणे-बेंगलोर महामार्गावर आसले गावच्या हद्दीत धोम पाटबंधारे वसाहत वसवली. त्यावेळी तेथे आधीपासून असणाऱ्या वनराईत तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेकडो झाडे लावून भर घातली. महामार्गावरून प्रवास करताना भुर्इंज पाचवड दरम्यान असलेल्या कृष्णा पुलावरून या वनराईचे मनमोहक दर्शन होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे येथील शेकडो झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. झाडांची ही कत्तल सुरू असून, याबाबत संताप व्यक्त होत आहे.
या शेकडो झाडांच्या कत्तलीमागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धोम पाटबंधारे वसाहतीसाठी स्थानिक जनतेची जमीन संपादीत करण्यात आली. या ठिकाणी वसाहतीपूर्वी असणारी आणि कुणालाही अडसर न ठरणारी अनेक झाडे आहेत. त्या झाडांवर जेव्हा कुऱ्हाड उगारली तेव्हा स्थानिकांनी झाडे तोडू नका, अशी विनवणी केली. मात्र, त्यांना न जुमानता कत्तल सुरू ठेवण्यात आली.
एकीकडे शासनाचा वनविभाग झाडे लावा म्हणून मोठ-मोठ्या मोहिमा राबवत आहे. विविध संस्थांवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवण्याची मोठी सक्ती करण्यात आली आहे तर दुसरीकडे मात्र शासनाच्याच धोम पाटबंधारे विभागाकडून शेकडो झाडे तोडली जात आहेत. लाकूडतोड माफिया आमिष दाखवून अशा प्रकारे वृक्षतोड करत असून, त्याला शासकीय अधिकारी, कर्मचारीही बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.


म्हणे.. धोकादायक होती म्हणून तोडली

धोम पाटबंधारे विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून या झाडांचा लिलाव करण्यात आल्याचे तसेच झाडे धोकादायक होती म्हणून तोडली, असे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता जी झाडे तोडली आहेत त्या झाडांच्या दहा-वीस मीटर अंतरामध्येही एखादे घर नाही किंवा कार्यालय नसल्याचे दिसून येत आहे. तसेच वृक्षतोडीचा आदेश किंवा लिलावाची प्रतही, असे सांगणाऱ्यांकडून दाखवली जात नाही. ती प्रत सातारच्या कार्यालयात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत धोम पाटबंधारे विभागाच्या सातारा कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांना या प्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचे निदर्शनास आले.


परवानगी न घेता कत्तल..
काही ठराविक प्रकारची झाडे वगळता वड, पिंपळ, लिंब यांसह अनेक प्रकारची झाडे तोडण्यासाठी महसूल विभागाची परवानगी आवश्यक असते, अशी माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे याबाबत महसूल विभागाच्या पाचवड विभागाचे मंडल अधिकारी व्ही. एन. जाधव यांच्याकडे या वृक्षतोडीसाठी परवानगी घेतली होती का? अशी विचारणा केली असता त्यांनी धोम पाटबंधारे विभागाने अशाप्रकारची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे पाचवड मंडलातील आसले गावच्या हद्दीत आणि धोम पाटबंधारेच्या वसाहतीत झालेली वृक्षतोड बेकायदा असल्याचे आता समोर येत आहे.

Web Title: The slaughter of eight truck trees is illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.