सातारा : ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक विविधता असलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटनातून रोजगार निर्मितीची क्षमता लक्षात घेऊन राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कोयनानगरला स्काय वॉक आणि नायगावमध्ये आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.राज्य विधानसभेत सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी एकूण १९६३ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुढील दहा वर्षांत १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आरोग्य, पर्यटन धोरणही आखण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास माहीत व्हावा, यासाठी शिवसृष्टीसारखे विविध प्रकल्प हाती घेऊन त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील जल पर्यटनासाठी निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. तसेच ठाणे आणि कोयनानगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्काय वॉक उभारणीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
कोयनानगरात स्काय वॉक, नायगावला सावित्रीबाईंचे स्मारक; सातारा जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी अर्थसंकल्पात घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:02 IST