मजले बांधणारे हात देणार वृद्धांच्या आयुष्याला आकार

By Admin | Updated: August 14, 2015 21:47 IST2015-08-14T21:47:28+5:302015-08-14T21:47:28+5:30

आज उद्घाटन : ना नफा-ना तोटा तत्त्वावर मंगलमूर्ती केअर टेकर सेंटर-- गूड न्यूज

The size of the floor will be given to the elderly | मजले बांधणारे हात देणार वृद्धांच्या आयुष्याला आकार

मजले बांधणारे हात देणार वृद्धांच्या आयुष्याला आकार

सातारा : घरातील ज्येष्ठ मंडळी पोटच्या मुलाला आणि सुनांना अडगळीतील वाटू लागतात. त्यांच्या आरोग्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं. समाजातील ज्येष्ठ नागरिक व अनाथांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातारा येथील बांधकाम व्यावसायिक सयाजी चव्हाण हे बंधू डॉ. जयदीप चव्हाण यांच्या मदतीने जेष्ठांचे आयुष्य सावरण्यास निघाले आहेत. त्यांच्या शिवविजय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री मंगलमूर्ती केअर टेकर सेंटरचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या मंगलप्रसंगी सातारा येथे होत आहे. मजले बांधणारे हात वृद्धांच्या आयुष्याला आकरा देणार आहेत.पांढरा झप्पा कुर्ता, गळ्यात सोन्याच्या साखळ्या आणि डोळ्यावर काळा गॉगल घातलेला बिल्डर पाहिला की, तो सर्वसामान्यांना लुटणारच, स्वस्तात जागा घेऊन त्यावर घर बांधून पैसा कमावणार आहे, असा समज समाजात निर्माण झालेला आहे. हाच समज चुकीचा ठरविण्यासाठी सयाजी चव्हाण यांनी विडा उचलला आहे. बंधू डॉ. जयदीप चव्हाण यांच्या मदतीने ज्येष्ठ आणि अनाथांची काठी बनण्याचा संकल्प केला आहे.
डॉ. जयदीप चव्हाण यांना श्री मंगलमूर्ती रुग्णालयाच्या माध्यमातून सातारकरांची सेवा बजावताना अनेक अनुभव आले. त्यातील काही चांगले होते, तर काही वाईट अंगावर काटा आणणारे होते. वाटेल तेवढे उच्च दर्जाचे उपचार करून आपण वृद्धांचा जीवनकाल वाढवत आहोत, ही चांगली बाब आहे. मात्र, केवळ उपचार म्हणजे सर्व काही आहे, असे नाही. उपचाराबरोबरच नंतरची सेवा सुश्रुषा व घरी द्यावयाची औषधे ही महत्त्वाची होऊन बसली आहेत. जुन्या आजाराचे रुग्ण रुग्णालयात ठेवणे परवडत नाही आणि वृद्धांची घरी सेवा करता येत नाही. यावर पर्याय म्हणून सातारा येथे मंगलमूर्ती केअर टेकर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)

मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
- सयाजी चव्हाण

अनाथांसाठी विशेष सहकार्य
एका जागेवर खिळलेल्या अनाथांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात येणार आहे. या ठिकाणी चोवीस तास वीज, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, दररोज अंघोळीसाठी गरम पाणी, दररोज स्वच्छ कपडे, करमणुकीसाठी टीव्ही, वाचनालय असणार आहे. वर्षातून दोन वेळेला सहलही काढण्यात येणार आहे.

Web Title: The size of the floor will be given to the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.