६० वर्षांनंतर गायकवाडवाडीला एसटी
By Admin | Updated: June 30, 2015 00:20 IST2015-06-29T22:39:36+5:302015-06-30T00:20:19+5:30
ही सेवा कायमस्वरूपी टिकविण्यासाठी साठेवाडी, गायकवाडवाडी, घोलपवाडी, निगडी आदी गावांतील ग्रामस्थांनी सहकार्य करावे,

६० वर्षांनंतर गायकवाडवाडीला एसटी
मसूर : ‘कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेकडील शेवटचे टोक असलेल्या गायकवाडवाडी येथे एसटी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून वारंवार होत होती. सर्वसामान्य जनता, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी या गावाला एसटी सुरू झाली आहे. ही सेवा कायमस्वरूपी टिकविण्यासाठी साठेवाडी, गायकवाडवाडी, घोलपवाडी, निगडी आदी गावांतील ग्रामस्थांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मानसिंगराव जगदाळे यांनी केले.
गायकवाडवाडी, ता. कऱ्हाड येथे एसटीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजीराव जाधव होते. यावेळी कोरेगाव आगाराचे प्रमुख डी. एन. चव्हाण, वाहतूक नियंत्रक एन. जे. कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ‘गायकवाडवाडीला मसूर व वाठार या दोन प्रमुख बाजारपेठा जवळ आहेत. येथे जाण्यासाठी एसटीची सेवा सोयीची झाली आहे. यापुढेही परिसरातील जनतेच्या गैरसोयी सोडविण्यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहणार आहे.’आगारप्रमुख चव्हाण म्हणाले, ‘गावाला एसटी सुरू झाल्याने विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी पास काढून विविध सवलतींचा फायदा घ्यावा. एसटी सुरू करण्याचे काम आम्ही केले असून, ते टिकविण्याचे काम तुम्हा सर्वांचे आहे.’ यावेळी दहावीत यश संपादन केलेल्या कीर्ती कदम, गौरी गायकवाड, रामचंद्र गायकवाड आदी विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास रामचंद्र गायकवाड, विठ्ठल गायकवाड, रमेश चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीरंग पवार यांनी स्वागत केले. माजी सरपंच संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. युवराज पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)