सहाव्या दिवशीही उमेदवारांची माघारीकडे पाठ !
By Admin | Updated: April 17, 2015 00:12 IST2015-04-16T22:53:59+5:302015-04-17T00:12:34+5:30
जिल्हा बँक निवडणूक : २०३ अर्ज कायम; इच्छुकांची मनधरणी करताना आमदार मंडळी मेटाकुटीस

सहाव्या दिवशीही उमेदवारांची माघारीकडे पाठ !
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या १२८ उमेदवारांनी सादर केलेल्या २०३ अर्जांपैकी एकाही उमेदवाराने सहाव्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. वरिष्ठ पातळीवरून कोणताच निर्णय झालेला नसल्याने उमेदवार प्रतीक्षेत आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा, असे बारामतीकरांचे आदेश आहेत. या व्यतिरिक्त सविस्तर चर्चेसाठी बैठक झाली नसल्याने सर्वच जण खोळंबले आहेत. गुरुवारी (दि. १६) अर्ज मागे घेण्याचा सहावा दिवस होता. आपले इप्सित साधल्यानंतर काही उमेदवार आता उमेदवारी अर्ज काढून घेतील, अशी अपेक्षा होती; परंतु अनेकजणांना अपेक्षित ‘शब्द’ मिळाला नसल्याचे समोर येत असल्याने कुणीही अर्ज काढून घेण्यासाठी सरसावले नाही. दरम्यान, आपली उमेदवारी टिकून राहावी, यासाठी काही उमेदवारांनी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावलेली आहे. (प्रतिनिधी)
इच्छुकांना थोपविण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान--सांगा डीसीसी कोणाची ?
पाटण, माण-खटाव व कऱ्हाड दक्षिण वगळता राष्ट्रवादीचे जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व आहे. या वर्चस्वातून कार्यकर्त्यांची संख्या जशी वाढली तशीच त्यांच्या आकांक्षाही वाढल्या आहेत. त्यातूनच जिल्हा बँकेसाठी या पक्षातील कार्यकर्त्यांचेच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.
आता इच्छुकांना थोपविण्याचे मोठे दिव्य राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना पार पाडावे लागत आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून दबावतंत्र सुरू असल्याने त्यांना सांभाळून घेण्याची कसरत बारामतीकरांच्या सल्ल्याने स्थानिक नेते मंडळींना करावी लागणार आहे.