सहा विद्यार्थ्यांना जमावाची बेदम मारहाण
By Admin | Updated: December 2, 2014 00:23 IST2014-12-01T22:47:10+5:302014-12-02T00:23:36+5:30
विद्यार्थी महाबळेश्वरचे : वाईत महाविद्यालय परिसरात घटना

सहा विद्यार्थ्यांना जमावाची बेदम मारहाण
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील सहा विद्यार्थ्यांना वाईच्या किसन वीर महाविद्यालयात सुमारे साठ ते सत्तरजणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. जमावाच्या तावडीतून सुटून या तरुणांनी महाबळेश्वर गाठले.
अनस नासीर महाबळे, शकील रफीक महापुळे, शदाब हिदायत नालबंद, समर नासीर वारणे, रमीज खाजा वारुणकर व सैफअली फारुख डांगे अशी मारहाण झालेल्यांची नावे असून, हे सर्वजण महाबळेश्वरच्या रांजणवाडी भागातील रहिवासी आहेत. वाईच्या किसन वीर महाविद्यालयात ते शिकतात. आज, सोमवारी सकाळी हे सर्वजण कॉलेजमध्ये गेले. पहिला तास ‘आॅफ’ असल्याने ते मैदानावर बोलत बसले. अकरा वाजता साठ ते सत्तरजणांचा जमाव त्यांच्यावर चालून आला व काठ्या-दांडक्यांच्या व पट्ट्याच्या साहाय्याने या पाचजणांना बेदम मारहाण करू लागला. जमावातील सर्वजण शिवीगाळ करीत होते आणि ‘उद्या कॉलेजात दिसल्यास जिवे मारू,’ अशी धमकी देत होते, असे अनस महाबळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या तरुणांनी जमावाच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घाबरून पसरणी घाटाच्या दिशेने पळ काढला. ‘त्यावेळी हा जमाव आमचा पाठलाग करीत होता आणि त्यांच्या हातात रॉकेलचे कॅन होते,’ असे फिर्यादीत म्हटले आहे. महाबळेश्वर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास वाई पोलिसांकडे वर्ग केला आहे. (प्रतिनिधी)