सांगलीत आणखी सहा पिस्तूल जप्त

By Admin | Updated: June 19, 2016 00:48 IST2016-06-19T00:48:02+5:302016-06-19T00:48:02+5:30

तिघांना अटक : आंतरराज्य टोळी सक्रिय; धागदोरे हाती

Six more pistols seized in Sangli | सांगलीत आणखी सहा पिस्तूल जप्त

सांगलीत आणखी सहा पिस्तूल जप्त

सांंगली : रिव्हॉल्व्हर तसेच पिस्तूल तस्करी व विक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या सांगलीतील टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी आणखी सहा पिस्तूल जप्त केली आहेत. टोळीतील आणखी तिघांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय आहे. यासंदर्भात महत्त्वाचे पुरावेही मिळाले आहेत. लवकरच या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले की, नव्याने अटक केलेल्यांमध्ये संतोष दत्तात्रय माळी (वय ३२, रा. विजय मराठा चौक, सांगलीवाडी), सुरेश बापूराव खोमणे (१९, कोराळे-खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) व गणेश नेमिनाथ घोडके (१९, पाण्याच्या टाकीजवळ, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. यापूर्वी अस्लम ऊर्फ सय्यदलाल सुतार, प्रशांत कोळी, सचिन चंदनशिवे, तौफीक शेख या चौघांना अटक केली होती. ते साखर कारखाना परिसर व माधवनगर परिसरातील आहेत. त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर, चार पिस्तूल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी या तिघांची नावे निष्पन्न झाली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सहा पिस्तूल सापडली. यातील एका पिस्तूलमधून एकावेळी १२ राऊंड झाडता येतात.
शिंदे म्हणाले की, रिव्हॉल्व्हर तस्करी व विक्री करणारी ही टोळी मोठी आहे. यामागे आंतरराज्य टोळीचा हात आहे. त्यांना या शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य तस्कराचे नाव निष्पन्न झाले आहे. तो परराज्यातील आहे. त्याला पकडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पोलिसांचे एक पथक तपासासाठी पाठविले जाणार आहे. स्थानिक आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का, याची माहिती काढण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या टोळीकडून दहा पिस्तूल व एक रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. परराज्यातील तस्कर हाती लागला, तर तपासाला गती मिळेल. याचा मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त केलेल्या पिस्तुलाचा वापर झाला आहे का, याची तपासणी केली जात आहे.
नरळे यांना बक्षीस
शिंदे म्हणाले की, पिस्तूलची खरेदी व विक्री करणारी सांगलीत टोळी सक्रिय असल्याची माहिती सर्वप्रथम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस नाईक बिरोबा नरळे यांना मिळाली होती. त्यांच्या माहितीमुळे या टोळीचा पर्दाफाश करता आला.
त्यामुळे त्यांना रोख दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. गुन्हेगारी आढावा बैठकीत त्यांचा बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला जाईल.

Web Title: Six more pistols seized in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.