बूथ उधळल्याच्या आरोपातून उदयनराजेंसह सहा निर्दोष
By Admin | Updated: March 27, 2015 00:32 IST2015-03-27T00:32:01+5:302015-03-27T00:32:01+5:30
न्यायालयाचा निर्णय : सुशील मोझर, चिटणीससह इतरांचा समावेश

बूथ उधळल्याच्या आरोपातून उदयनराजेंसह सहा निर्दोष
सातारा : जिल्हा परिषदेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या मतदानादिवशी अपक्ष उमेदवाराचे बूथ उधळल्याच्या आरोपातून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सहा जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. गावडे यांनी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ११ मार्च २००७ रोजी मतदान झाले होते. त्यावेळी अपक्ष उमेदवार विमल बाळासाहेब गोसावी यांचा मोळाचा ओढा येथील पोलिंग बूथ उधळल्याचा आरोप खासदार उदयनराजे, नासीर शेख, युनूस झेंडे, शिरीष चिटणीस, सुशील मोझर, नरेंद्र बेलोशे यांच्यावर ठेवला होता.
सरकार पक्षातर्फे बाळासाहेब गोसावी आणि संजय पाटील हे दोन साक्षीदार तपासण्यात आले. अन्य साक्षीदार हजर राहिले नाहीत. खासदार उदयनराजे यांच्या वतीने अॅड. ताहेर मणेर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सहा जणांची निर्दोष मुक्तता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांविरुद्ध खटल्यांची सुनावणी वेगाने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार या खटल्याची सुनावणी सुरू झाल्याचे मणेर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)