सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: May 10, 2017 23:44 IST2017-05-10T23:44:25+5:302017-05-10T23:44:25+5:30
सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात असणाऱ्या अंबवडे बुद्रुक या गावातील पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा उरमोडी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला, तर एका युवतीला वाचविण्यात यश आले. ही हृदद्रावक घटना बुधवारी दुपारी घडली.
काजल सुरेश जाधव (वय १९), ऋतुजा सुरेश जाधव (१६) अशी बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत. गेल्या काही वर्षांपासून जाधव कुटुंबीय ठाणे-मुंबई येथे स्थायिक झाले आहे. उन्हाळी सुटीनिमित्त या दोघी गावी आल्या होत्या. बुधवारी दुपारी या दोघींसह एकूण आठजण उरमोडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. पात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तीन मुली बुडू लागल्या; मात्र इतर काहीजणांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी अंकिता जाधव (१५) या मुलीला वाचविले. मात्र, काजल आणि ऋतुजा पाण्यात बुडाल्या. या दोघींनाही पोहता येत नव्हते. बराचवेळ शोध घेतल्यानंतर दोघींना तत्काळ बाहेर काढले. त्यानंतर गावातील रिक्षाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
वडिलांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडील ठाण्याहून गावी येण्यास निघाले आहेत. या दोघींना एक भाऊ असून, पे्रम जाधव (१०) असे त्याचे नाव आहे. काजल ही बारावीमध्ये तर ऋतुजा दहावीत शिकत होती.
आत्तापर्यंत चौदाजण बुडाले!
या उरमोडीच्या नदीपात्रात आत्तापर्यंत चौदाजण बुडाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून समोर आले आहे. उरमोडीचे पात्र अंत्यत धोकादायक असून, भल्याभल्यांची याठिकाणी पोहताना दमछाक होत असते. हे पात्र धोकादायक असतानाही याठिकाणी कोणताही सर्तकतेचा फलक लावण्यात आला नाही. त्यामुळे अनेकांचा नाहक बळी जात आहे. प्रशासनाने तातडीने पाऊल उचलून फलक लावावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
वास्तुशांतीपूर्वीच घरात सन्नाटा
सुरेश जाधव यांनी लावंघर रस्त्यावर नवीन घर बांधले आहे. या घराची वास्तुशांती दि. १७ रोजी आहे. त्यामुळे ॠतुजा आणि काजल आई व भावासोबत काही दिवसांपूर्वीच गावी आल्या होत्या. नवीन घर बांधल्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. मात्र, घराची वास्तुशांती होण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे अंबवडे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.