सरपंच निवडीवरून शेणोलीत धुमश्चक्री!
By Admin | Updated: August 28, 2015 00:04 IST2015-08-28T00:04:08+5:302015-08-28T00:04:08+5:30
गावात तणाव : माजी सरपंचासह तिघे गंभीर; पोलीस बंदोबस्त तैनात

सरपंच निवडीवरून शेणोलीत धुमश्चक्री!
कऱ्हाड/शेणोली : शेणोली (ता. कऱ्हाड) येथे सरपंच, उपसरपंच निवडीच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादावादीचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मारामारीत पर्यवसान झाले. दोन राजकीय गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी सरपंचासह तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरू होती. काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच काहीजण पसार झाले आहेत.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेणोली ग्रामपंचायतीची निवडणूक ४ आॅगस्टला पार पडली आहे. बुधवारी तेथील सरपंच, उपसरपंच निवडीही पार पडल्या. यावेळी माजी सरपंच नारायण शिंगाडे यांच्या गटातील सरपंच व्हावा, अशी शिंगाडे गटाची अपेक्षा होती. मात्र, विरोधी गटातील महिलेला सरपंचपद मिळाले. त्यामुळे बुधवारपासून गावात तणावपूर्ण वातावरण होते. अशातच गुरुवारी सकाळी सरपंच, उपसरपंच निवडीच्या कारणावरून नारायण शिंगाडे यांचा विरोधी गटातील काही कार्यकर्त्यांशी वाद झाला. त्यावेळी शिंगाडे गटातील काहीजणांनी विरोधी गटातील एकास मारहाण केली. त्याला ग्रामस्थांनी उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीनंतर विरोधी गटातील काहीजण आक्रमक झाले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नारायण शिंगाडे हे गावातील मुख्य बाजारपेठेत आले असताना विरोधी गटातील काहीजणांनी त्यांना घेरले. सकाळी केलेल्या माराहाणीचा जाब विचारत त्यांनी शिंगाडे यांना धक्काबुक्की केली. यावेळी शिंगाडे गटातील काहीजण त्याठिकाणी पोहोचले. त्यामुळे हा वाद वाढत गेला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. विरोधी गटातील काहींनी नारायण शिंगाडे यांच्यासह त्यांचा पुतण्या सतीश शिंगाडे व अन्य एकास बेदम मारहाण केली. मारहाणीत ते तिघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती. (वार्ताहर)
मैत्रीपर्वातील बिघाडी ठरली ठिणगी
शेणोलीमध्ये ४ आॅगस्टला निवडणूक पार पडली. त्यामध्ये अतुल भोसले समर्थक नारायण शिंगाडे व उंडाळकर समर्थकांनी एकत्रितपणे आठ जागा मिळवून विजय संपादन केला. मात्र, बुधवारी प्रत्यक्षात सरपंच निवडीवेळी उंडाळकर समर्थक तीन सदस्य पृथ्वीराज चव्हाण, मदनराव मोहिते यांच्या गटाच्या बरोबर राहिले. त्यांनी सरपंच, उपसरपंच निवडीत बाजी मारली. याच कारणावरून हा वाद पेटल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
गुरुवारी दुपारी मदनराव मोहिते समर्थक कार्यकर्त्याला शिंगाडे गटातील काहीनी मारहाण केली. त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या मोहिते समर्थकांनी शिंगाडे यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.