साहेब, आता तरी फाटक उघडा...

By Admin | Updated: November 9, 2014 23:27 IST2014-11-09T22:34:13+5:302014-11-09T23:27:38+5:30

वडूजला ‘खाकी’ हतबल : पोलीस निरीक्षकांच्या बंगल्यालाच हातगाड्यांचा विळखा

Sir, open the gate now ... | साहेब, आता तरी फाटक उघडा...

साहेब, आता तरी फाटक उघडा...

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात ‘खाकी’चा वचक नसल्याचे वेगवेगळ्या घटनांमुळे स्पष्ट होत आहे. पोलीस निरीक्षकांच्या बंगल्याजवळील मुख्य फाटकाशेजारीच मोकळे हातगाडे लावल्याने कित्येक वर्षे हे फाटक बंद आहे. बंगल्यासमोरच हाकेच्या अंतरावर बसस्थानक आहे. परंतु हे फाटक बंद असल्याने ‘साहेब, आता तरी फाटक उघडा दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत,’ अशी आर्त हाक जनसामान्यांच्यातून उमटत आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज व बसस्थानक परिसरातच पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमधूनच सडकसख्याहरी मोटरसायकलवरून ये-जा करतात. म्हणून काही वर्षांपूर्वी हे फाटक बंद करण्यात आले. याचा तोटा हुतात्मा विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला. खेड्या-पाड्यातून सकाळी लवकर एस.टी. पकडून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना मोठा वळसा घालून शाळेत जावे लागत आहे. पोलीस कॉलनीचा रस्ता हा पायवाट म्हणून वापरताना जवळ पडत होता; परंतु बसस्थानक समोरीलच फाटक कायम बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना याचा कळत-नकळत फटका बसत आहे.
आतापर्यंत बसस्थानकामध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण जादा होते. त्यात भरीस -भर म्हणून गेल्या वर्षापासून लाखांचे दागिने व रोख रक्कम अशा स्वरूपाच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असतानादेखील पोलीस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असल्याचे आढळून येत आहे.
शुक्रवार, दि. ७ रोजी अशीच घटना घडली. गुरसाळे येथून दहिवडीला जाण्याकरिता वैशाली जाधव या वडूज बसस्थानकात दुपारी एक वाजता आल्या. परंतु बसमध्ये प्रवेश करतानाच त्यांच्या पिशवीमधून अज्ञात चोरट्याने पर्स काढली. यामध्ये असलेले साडेआठ तोळे सोने व १३,७०० रुपयांची रोकड चोरीस गेले. या प्रसंगाने प्रवाशांच्या मनामध्ये शंका उपस्थित होते की, बसस्थानकात परिसरात असणारे पोलीस कर्मचारी नेमके कोठे उभे असतात? परंतु ते असतात; मात्र त्यांच्या अंगावर खाकी पोशाख नसतो. (तो खाकी पोशाख त्यांना आवडत नाही का, असा सवाल ही प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.) पोलीस ठाण्याच्या आवारातच मोटारसायकलवरून ‘ट्रिपल सीट’ जाणारी मंडळी बिनदिक्कत ये-जा करतात. पोलीस हा जनतेचा मित्र असावा; परंतु त्या बरोबरीने कायदा व सुव्यवस्थेसाठीच आपली नेमणूक आहे, याचे भान ही या कर्मचाऱ्यांनी ठेवावे, असे नागरिक उघड बोलतात. पोलीस निरीक्षकांच्या बंगल्याचे फाटक उघडे राहिले तर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील. त्याचबरोबरीने वाहतूक सुरळीत होऊन बसस्थानकातील सडकसख्याहरींचा आपोआपच बंदोबस्त होईल, असे नागरिकांना वाटते. (प्रतिनिधी)

सुचना देवूनही अतिक्रमण निघेना..
पोलीस निरीक्षकांच्या बंगल्याजवळील मुख्य फाटकाशेजारीच मोकळे हातगाडे लावल्याने कित्येक वर्षे हे फाटक बंद आहे. साहेब आतमध्ये असतात की बाहेर हे काणालाच कळत नाही. या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने वारंवार सुचना देण्यात आल्या. मात्र त्या विक्रेत्यांवर काहीच परीणाम होत नाही. यावर साहेबही बोलत नाहीत. त्यामुळे येथील अतिक्रमण अक्षरश: बोकाळले आहे. हे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Sir, open the gate now ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.