साहेब तुमची सोय बघितली, जनतेची कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST2021-08-26T04:41:58+5:302021-08-26T04:41:58+5:30

वडूज : शहरातील पस्तीस हजार लोकसंख्या मागे वडूज शहरात फक्त दोनच शौचालय अस्तित्वात आहेत. पुसेगाव रस्त्यावरील न्यायालय जवळील ...

Sir, did you take care of the people, when? | साहेब तुमची सोय बघितली, जनतेची कधी?

साहेब तुमची सोय बघितली, जनतेची कधी?

वडूज : शहरातील पस्तीस हजार लोकसंख्या मागे वडूज शहरात फक्त दोनच शौचालय अस्तित्वात आहेत. पुसेगाव रस्त्यावरील न्यायालय जवळील व दहिवडी-कऱ्हाड (त्रिकोणवरील) रस्त्यावरील मुतारी देखील यापूर्वीच नामशेष केलेली आहे तर बाजार पटांगणातील तीन वर्षांपूर्वीची वापरात असलेली जुनी मुतारी पाडून नवीन शौचालय बांधण्याचा नगरपंचायतीचा घाट अंगलट आल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व गंभीर विषयांवर मुख्याधिकारी यांचा कानाडोळाच जबाबदार असल्याच्या चर्चा आहेत तर मुख्याधिकारी दालनातच स्वतःसाठी स्वतंत्र मुतारीची सोय करून जनतेची हालअपेष्टा बघणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी काय साध्य केले, हा सध्या संशोधनाचा विषय आहे.

सार्वजनिक मुतारी नसल्याने शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या त्रिकोण परिसर, बाजार पटांगण आदी परिसरात नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडूज शहरात दररोज हजारो महिला व पुरुष यांची ये-जा असते; मात्र शहरातील असुविधा व स्वच्छतागृहांचा वानवा असल्याने हुतात्म्यांची भूमी नाहक बदनाम होत आहे. तर नगरपंचायत कर भरणाऱ्या गाळेधारकांना, बाजारातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना लघुशंकेसाठी विनाकारण पायपीट करावी लागत आहे तसेच इतर सोयी-सुविधांपासून आजपर्यंत व्यवसाय करणारे वंचितच राहिले आहेत. त्यामुळे वडूज परिसरातील जुन्या वापरात असलेल्या मुतारी पाडून व लोकांची गैरसोय करून नगरपंचायत प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे, हेच समजेना. नगरपंचायतीस मंडईद्वारे कररूपी लाखोंचे उत्पन्न मिळत असतानादेखील त्यापटीत कोणत्याच सोयी-सुविधा मिळत नसल्याची मोठी खंत व्यक्त होत आहे. ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना सुरक्षित बैठक व्यवस्था, ना शौचालय, ना मुतारी. या अवस्थेत गाळाधारक, शेतकरी, महिला शेतकरी व व्यापारी नगरपंचायत प्रशासनाचा अधिभार सोसत आहेत. कित्येक वर्षे या बाजार पटांगणात तालुक्याचा मुख्य बाजार भरत असून, कररूपी लाखो रुपये मिळूनदेखील संबंधित प्रशासन या गरजासंदर्भात टाळाटाळ करत आहेत.

शहरातील यापूर्वी सुस्थितीत असलेल्या मुतारी बांधकामाचे काही वर्षांपूर्वी जुने बांधकाम असलेल्या स्त्री-पुरुष मुतारी पाडण्यामागचे गौडबंगाल सर्वसामान्यांना समजलेच नाही. संबंधित प्रशासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून मगच कररूपी पावत्या शेतकरी व व्यापाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर साहेब तुमची सोय बघितली, जनतेची कधी? सार्वजनिक मुतारी रातोरात गायब, तर साहेबांची एक रात्रीत तयार, अरे भाऊ वडूज शहरात मुतारी कोठे हाय? जनतेतील अश्या अनेक शंका-कुशंकांचे आतातरी वडूजमधील नेतेमंडळी व संबंधित अधिकारी निरसन करणार का याकडे वडूजकरांसह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

-चौकट-

साहेबांचा सवता सुभा.....

नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी व नागरिक यांच्यासाठी नगरपंचायत इमारतीत एकच शौचालय वापरात असून दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ नगरपंचायत कार्यालयात असते. अडगळीतील जागेत असलेल्या इमारतीमध्ये दाटावाटीने कर्मचारी यांचे दैनंदिन कामकाज सुरू असते. मुख्याधिकारी यांनी स्वतंत्र शौचालय सुरू करून नगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी यांच्यापासून फारकत घेत सवतासुभा घेतल्याच्या खुमासदार चर्चा सुरू आहेत.

फोटो: वडूज नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी दालनातील स्वतंत्र शाैचालय. ( शेखर जाधव )

Web Title: Sir, did you take care of the people, when?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.