सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यूची साथ पसरतेय!
By Admin | Updated: November 10, 2014 23:01 IST2014-11-10T23:01:36+5:302014-11-10T23:01:36+5:30
रुग्णसंख्या ३९ : हिवताप विभागाकडून लपवाछपवी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यूची साथ पसरतेय!
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यूची साथ झपाट्याने पसरू लागली आहे. गेल्या महिन्याभरात डेंग्यूचे अकरा रुग्ण आढळले असून, आतापर्यंत डेंग्यू रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. मात्र, या साथीबाबतची जिल्ह्यातील वस्तुस्थिती लपविण्याचा जिल्हा हिवताप विभागाकडून प्रयत्न केला जात आहे.
संपूर्ण राज्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. अनेकांचे बळीही गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत.
गेल्या दहा महिन्यांतील डेंग्यू रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेंग्यूची आकडेवारी पाहता गंभीर रूप धारण करीत आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवणारा जिल्हा हिवताप विभाग अद्यापही सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
प्रसार माध्यमांना टाळले
डेंग्यू नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, रुग्णांची स्थिती काय, कोणत्या प्रकारचे उपचार सुरू आहेत, याबाबतची कोणतीही माहिती जिल्हा हिवताप विभागाकडून सांगितली जात नाही. साथीची वस्तुस्थिती लपविण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्विनी जंगम प्रसार माध्यमांपासून दूर राहणेच पसंत करीत आहेत. केवळ कर्मचाऱ्यांच्या बैठका आणि कागदोपत्री नियोजनातच हिवताप विभाग गुंतलेला आहे.