उन्हामुळे बाजारपेठेत शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:50+5:302021-03-09T04:41:50+5:30
तारळे : तारळे बाजारपेठेत सध्या मंदीचे वातावरण आहे. कडक उन्हाच्या त्रासापासून सुटका मिळावी म्हणून दुपारच्या वेळी नागरिकांनी खरेदी करणे ...

उन्हामुळे बाजारपेठेत शांतता
तारळे : तारळे बाजारपेठेत सध्या मंदीचे वातावरण आहे. कडक उन्हाच्या त्रासापासून सुटका मिळावी म्हणून दुपारच्या वेळी नागरिकांनी खरेदी करणे टाळले आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
एसटी वेळेवर येत नसल्याने गैरसोय
तांबवे : ग्रामीण भागात एसटी वेळेवर येत नसल्याने शाळा, महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. परीक्षांचा कालावधी असल्याने शाळेच्या वेळेत एसटी बस सोडून पाससाठी विलंब लावू नये, अशी मागणी विद्यार्थी व पालकांतून होत आहे.
एटीएम मशीन बंद
सातारा : येथील कॉलेज परिसरात असलेले एटीएम मशीन पैशांअभावी वारंवार बंद पडत असून, त्यामुळे कॉलेज परिसरातील विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी पैसे काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरात यावे लागत असल्याने त्यांना आर्थिक तोटा होत आहे.
शीतपेयांच्या विक्रीत वाढ
कोरेगाव : सध्या वातावरणात उष्माचे प्रमाण वाढले असल्याने शीतपेयांची मागणी वाढली आहे. त्यामुळे चहाऐवजी शीतपेयांचीच जास्त प्रमाणात विक्री वाढली असून, शीतपेय विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची सध्या चांगलीच कमाई होताना दिसून येत आहे.
वाहतुकीचा बोजवारा
मलकापूर : ढेबेवाडी फाटा येथे वाहनचालक अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहन लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून, वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. मलकापूर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वानरांकडून नुकसान
पेट्री : येथील शेतशिवारातील पिकांसह गावातील घराचे वानरांकडून नुकसान केले जात आहे. वानर गावातील घरांवर चढून कौले फोडत आहेत. शेतीमालाबरोबर घराचेही नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ऊसतोडींना वेग
सातारा : विभागातील ऊसतोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत, तसेच दिवसभर ऊसतोड करून रात्री लवकर परतत आहेत.