ज्ञानसूर्याची सही प्रतापसिंह हायस्कूलच्या नोंदवहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:33+5:302021-06-06T04:28:33+5:30

अवघ्या जगासाठी ज्ञानसूर्य म्हणून तेजोमय प्रकाश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा शहरातील श्री. छ. प्रतापसिंह ...

Signature of Gyansurya in the register of Pratap Singh High School | ज्ञानसूर्याची सही प्रतापसिंह हायस्कूलच्या नोंदवहीत

ज्ञानसूर्याची सही प्रतापसिंह हायस्कूलच्या नोंदवहीत

अवघ्या जगासाठी ज्ञानसूर्य म्हणून तेजोमय प्रकाश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा शहरातील श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झाले. आजही हायस्कूलच्या रजिस्टरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भीवा रामजी आंबेडकर असे असून, १९१४ क्रमांकाला तशी नोंद आहे. शिवाय त्यांची या रकान्यात स्वाक्षरीही आहे.

प्रवेश घेताना या शाळेच्या मनाला आणि तेथील मातीच्या कणाला पुसटशी कल्पनासुध्दा नसेल की हा बाल भीवा भविष्यात जगातला आदर्श विद्यार्थी ठरेल. परंतु, हे सारं भीवाने आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरं ठरवलं. या सातारच्या मातीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य जगाला मिळाला.

या हायस्कूलमध्ये त्यांचे पाऊल पडले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुध्दा त्यांना प्राप्त झाले. म्हणूनच आज छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या जगाचे प्रेरणास्थान ठरले आहे. म्हणूनच आज हे हायस्कूल पाहायला देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. हे हायस्कूल म्हणजे ऐतिहासिक ठेवा असून, तो जतन करणे आवश्यक आहे.

अमेरिका, इंग्लंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा यथोचित गौरव झालाय. तेथील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले आहेत. शिवाय तेथे ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असे कोट केलेले आहे. म्हणजे ज्यांना जगात ज्ञानाचे प्रतीक संबोधले जाते आणि जगातला सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सातारचे विद्यार्थी होत. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा देदिप्यमान असा वारसा या हायस्कूलला लाभलाय ही तमाम सातरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारने या हायस्कूलला कोणत्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय दर्जा देणं गरजेचं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी राजवाडा येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासन स्तरावर साजरा होत आहे. साताऱ्यातील साहित्यिक अरुण विश्वंभर जावळे यांनी तब्बल १५ वर्ष महाराष्ट्र सरकारकडे या विद्यार्थी दिवसासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे सरकारने २०१७मध्ये विद्यार्थी दिवसाची घोषणा केली आणि छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हे नव्याने चर्चेत आले.

खरंतर, समाजाला जबरदस्त प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ हा अत्यंत महत्त्वाचा ऊर्जादायी दिवस आहे. नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच सर्व समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे पाहायचे असेल तर विद्यार्थी दिवस भारतभर साजरा होणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत सातारचा हा विद्यार्थी दिवस भारतभर होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचेही साहित्यिक अरुण जावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ऐतिहासिक ठेवा म्हणून बाबासाहेबांची शाळेच्या नोंदवहीत असलेली सही जतन करणे तितकेच गरजेचे आहे.

केंद्र सरकार देणार सव्वाशे पत्रे...

शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासनस्तरावरुन साजरा व्हावा, यासाठी १५ वर्ष महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला. या आग्रहाला दाद देत सरकारने तीन वर्षांपूर्वी विद्यार्थी दिवस घोषित केला. आता हा विद्यार्थी दिवस भारतभर होण्यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा करावी, यासाठी राज्यभरातून १ लाख २५ हजार पत्रे दिल्लीला पाठवणार असून, काही पत्रे रक्ताने लिहिणार असल्याचे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी सांगितले.

- सागर गुजर

Web Title: Signature of Gyansurya in the register of Pratap Singh High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.