यश अन् अपयशाचा ‘सही’ फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:32+5:302021-06-06T04:28:32+5:30

सचिन काकडे सही हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते. काही व्यक्ती मराठी तर काही हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेत सही ...

The ‘signature’ formula of success and failure | यश अन् अपयशाचा ‘सही’ फॉर्म्युला

यश अन् अपयशाचा ‘सही’ फॉर्म्युला

सचिन काकडे

सही हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते. काही व्यक्ती मराठी तर काही हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेत सही करतात. प्रत्येकाची सही करण्याची पद्धतही अत्यंत निराळी असते. म्हणून दोन व्यक्तींच्या सह्या एकसारख्या कधीच नसतात. अगदी कॉपी केली तरी हुबेहूब सही करणे फार अवघड गोष्ट असते. त्यामुळे आज सही ही प्रत्येक व्यक्तीची ओळख झाली आहे. सही करण्यामागे आपल्या यश-अपयशाचे कारण दडलं असल्याचं न्युमेरोलॉजिस्ट सांगतात. त्यामुळे अनेकजण सही करण्यासाठी ‘सही’ फॉर्म्युला वापरू लागले आहेत.

आपल्या सहीमध्ये असा बदल करा तसा बदल करा, हा सल्ला अनेकांकडून दिला जातो. सही वरती चढत जाणारी, तिरपी असावी, तिच्याखाली आडवी रेघ ओढावी आणि त्या रेघेखाली दोन टिंबे द्यावीत, असेही सांगितले जाते. अशा सल्ल्यामुळे अलीकडे या प्रकारच्या सह्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. खरं म्हणजे अशाप्रकारे सह्या करणं सगळ्यांना फायदेशीर ठरतंच, असं नाही. तरीही सह्यांचा संबंध थेट आपल्या करिअर आणि यश-अपयशाशी जोडण्यात आल्याने अनेकजण न्युमेरोलॉजिस्टच्या सल्ल्याने आपल्या सह्यांमध्ये बदल करू लागले आहेत.

न्युमेरोलॉजिस्टच्या मते चुकीच्या पद्धतीने केलेली सही ही तुमच्या यशात मोठा अडथळा ठरू शकते. ज्यांना खूप मोठ्या समस्या असतात, सतत अपयश येत असते, कामे होत नाहीत, आर्थिक फटके बसतात अशा सर्वांच्या सह्या अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेल्या असतात.

गिचमिड सही असेल तर ती त्या व्यक्तीला रिझर्व्ह माईंडेड, अनावश्यक गुप्तता बाळगणारी बनवते. अशा व्यक्तीला मोठे अडथळे येऊ शकतात. सहीवर काट मारली असेल, सही खोडल्यासारखी असेल तर त्या व्यक्तीचे नुकसान होते.

सहीचा शेवट खाली उतरणारा असेल तर त्याचे खूप मोठे नुकसान होत राहते. सहीच्या शेवटी मागे जाणारी अंडरलाईन ओढली असेल तर अशी व्यक्ती भूतकाळातील दुःखद घटनांचे ओझे घेऊन जगात असते. काही लोक आपल्या सहीची सुरुवात वर्तुळाकारातून करतात किंवा सहीच्या पहिल्या अक्षराभोवती वर्तुळ काढून मग पुढे जातात. अशा व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत अडकून पडतात, ज्यातून बाहेर पडणे त्यांना अवघड होऊन जाते.

सही स्पष्ट नसणे, सहीमध्ये आपल्या नावापेक्षा आडनावाला महत्त्व देणे, केवळ इनिशिअल्सची सही करणे या गोष्टी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात बाधक ठरतात.

(चौकट)

चांगल्या सहीची लक्षणे

जे सहीमध्ये असते तेच त्या व्यक्तीच्या जीवनात असते. चांगली सही म्हणजे प्रगतशील जीवन आणि वर दिलेले दोष असणारी सही म्हणजे अडथळ्यांचे जीवन. आदर्श सही ही स्पष्ट परंतु कलात्मक, आकर्षक आणि वळणदार असते. या सहीमध्ये गिचमिडपणा अजिबात नसतो. ही सही पुढे-पुढे जाणारी असते, तिच्यात उगीचच मागच्या दिशेला जाणे हा प्रकार नसतो. पूर्णपणे निर्दोष अशी सही सापडणे अवघडच आहे. पण यशस्वी लोकांच्या सहीमध्ये फारसे दोष नसतात. याउलट अपयशी लोकांच्या सहीमध्ये अनेक दोष असल्याचे दिसून येते, असे न्युमेरोलॉजिस्ट सांगतात.

फोटो : मेल

Web Title: The ‘signature’ formula of success and failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.