‘सिग्नल’च बेशिस्त; कशी लागेल वाहतुकीला शिस्त..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST2021-08-17T04:44:26+5:302021-08-17T04:44:26+5:30
कऱ्हाड : ‘सिग्नल’ यंत्रणेने शहरात वाहतुकीला शिस्त लागली; पण समस्यांच्या विळख्यामुळे ‘सिग्नल’ परिसरच बेशिस्त असल्याचे दिसते. हे प्रश्न सोडविण्यासाठी ...

‘सिग्नल’च बेशिस्त; कशी लागेल वाहतुकीला शिस्त..?
कऱ्हाड : ‘सिग्नल’ यंत्रणेने शहरात वाहतुकीला शिस्त लागली; पण समस्यांच्या विळख्यामुळे ‘सिग्नल’ परिसरच बेशिस्त असल्याचे दिसते. हे प्रश्न सोडविण्यासाठी पोलिसांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही पालिकेने त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ही यंत्रणा दिवसेंदिवस गर्तेत सापडत आहे.
कऱ्हाड हे सातारा, सांगली आणि कोल्हापूरसाठी मध्यवर्ती शहर आहे. विस्तारलेल्या बाजारपेठेमुळे शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसते. त्यातच शहरातील रहदारीही वाढत आहे. या वाढत्या रहदारीचा विचार करून कोल्हापूर नाक्यापासून पोपटभाई पेट्रोल पंप, शाहू चौक, दत्त चौकमार्गे विजय दिवस चौकातून कृष्णा नाक्याकडे आणि पोपटभाई पेट्रोल पंपापासून भेदा चौक, विजय दिवस चौकातून कृष्णा नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागली. मात्र, सिग्नलचे चौकच सध्या बेशिस्त बनल्याचे दिसते. पालिकेकडून उपाययोजना होत नसल्यामुळे येथील प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत.
सिग्नल परिसरात शंभर मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’चा नियम आहे. मात्र, कऱ्हाडात सिग्नलच्या भोवतीच वडापचा गराडा आहे. प्रवाशांची ने-आण करण्यासाठी सिग्नलच्या प्रत्येक चौकात अनेक वाहने थांबलेली असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो. हातगाडेही याच परिसरात उभे असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना वाट काढणेही मुश्कील बनते, तसेच झेब्रा क्रॉसिंग, स्टाफ लाईन, नो पार्किंगचे फलक, अतिक्रमण अशा अनेक प्रश्नांनी शहरातील सिग्नलचे चौक वेढले असल्याचे दिसून येत आहे.
- चौकट
... या चौकात सिग्नल
१) पोपटभाई पंप चौक
२) भेदा चौक
३) कर्मवीर चौक
४) विजय दिवस चौक
५) कॉटेज हॉस्पिटल चौक
६) कृष्णा नाका चौक
- चौकट (फोटो : १६केआरडी०४)
पोलिसांनी सुचविलेल्या उपाययोजना
१) सिग्नलवर ‘झेब्रा क्रॉसिंग’ पट्टे मारावेत
२) ‘स्टाफ लाईन’ आखून घ्यावी
३) ‘नो पार्किंग झोन’ तयार करावेत
४) शंभर मीटरमध्ये ‘नो पार्किंग’ फलक लावावेत
५) सिग्नल परिसरात रस्त्यातील खड्डे मुजवावेत
- चौकट
सिग्नलवर झाडांच्या फांद्या
कर्मवीर चौक, विजय दिवस चौक आणि कॉटेज हॉस्पिटल चौकात मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. याच झाडांमध्ये सिग्नल उभारण्यात आले असून सध्या झाडांच्या फांद्या झुकल्या आहेत. त्यामुळे चालकांना सिग्नलच दिसत नाही. परिणामी, अनेकजण अंदाजावर वाहने चालवितात. या परिस्थितीकडेही पालिकेने लक्ष दिलेले नाही.
- चौकट (फोटो : १६केआरडी०३)
‘टायमर’ बंद
काही सिग्नल यंत्रणेचे ‘टायमर’ सध्या बंद आहेत. त्यामुळे किती वेळ थांबायचे, याचा अंदाजच चालकांना बांधता येत नाही. परिणामी, ग्रीन सिग्नल मिळताच चालकांची धांदल उडते.
- चौकट
‘झेब्रा क्रॉसिंग’ नाही, मग थांबायचं कुठं?
सिग्नलच्या ठिकाणी ‘झेब्रा क्रॉसिंग’चे पांढरे पट्टे नाहीत. पोलिसांची कागदी घोडी पालिका गांभीर्याने घेत नाही. परिणामी, पांढरे पट्टे नसल्यामुळे चालक निश्चित ठिकाणापेक्षा पुढे जाऊन वाहने थांबवतात. पोलिसांनी चालकाला हटकल्यास वादावादीही होते.
फोटो : १६केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात सिग्नलच्या चौकात ‘झेब्रा क्रॉसिंग’चे पट्टे नसल्यामुळे चालक कुठेही आणि कशीही वाहने थांबवितात.
फोटो : १६केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडात सिग्नलच्या चौकाला वडाप वाहनांचा नेहमी गराडा असतो.