सातारा : साताऱ्याला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगात असंख्य दुर्मिळ जीव-जंतू, पशु-पक्षी आहेत. त्यातच काही परदेशी पक्षीही स्थलांतरित होत असतात. अशाच लाजाळू स्वभावाचे कृष्णबलक पक्षी कुमठे, मापरवाडी तलावात आश्रयासाठी आले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर या पक्षांचे दर्शन घडल्याने पक्षिमित्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सातारा हा अत्यंत सुंदर निसर्गाने नटलेला प्रदेश आहे. त्याचीच भुरळ या स्थलांतरित पक्ष्यांना पडते. त्यामुळे ते या भूमीत येतात. मायणीतील येरळवाडी हे तलाव पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरत असतानाच कुमठे तलाव हादेखील दुर्मिळ आणि स्थलांतरित कृष्णबलक म्हणजे ब्लॅकस्टोर्क पक्ष्यांसाठी आश्रयस्थान बनला आहे. हे पक्षी तीन वर्षांपूर्वी येथे आले होते. हे पक्षी अत्यंत लाजाळू स्वभावाचे असल्याने माणसांपासून दूर राहतात. त्यामुळे यांचे दर्शन होणेही फार कठीण असते. कुमठे तलाव परिसरात कृष्णबलकाच्या बारा जोड्यांचे आगमन झाले आहे. त्यांचा येथे मुक्त वावर पाहायला मिळतो आहे. या पक्ष्यांचे मुख्य खाद्य बेडूक, मासे, लहान कीटक आणि लहान जलचर प्राणी आहेत.
कृष्णबलक हे ‘सिकोनिया निग्रा’ या कुळातील आहेत. साधारण तीन ते साडेतीन फूट आकाराचे आहेत. त्यांना सुंदर काळ्या, निळ्या फिरत्या रंगांचे पंख असतात. लालभडक चोच व पाय या पक्ष्याला आणखीनच सुंदर बनवतात. हे पक्षी लांब अंतर स्थलांतर करणाऱ्यांपैकी आहेत. कृष्णबलक युरोपियन देशांमधून तेथील बर्फवृष्टीपासून वाचण्यासाठी भारतात स्थलांतर करतात. यांची वीण युरोपात होत असल्याने येथे पक्षी फक्त आश्रयासाठी येतात. युरोपमधील झाडांवर यांचे मोठे घरटे वर्षानुवर्षे असते. त्यात हे दोन ते तीन अंडी देऊन पिल्लांचा संगोपन करतात. बर्फवृष्टीला सुरुवात होण्यापूर्वीच पिल्लांना घेऊन हे पक्षी आशिया आणि आफ्रिका या खंडांकडे प्रवास सुरू करतात. भारतात हे मुख्यत्वे काझीरंगा अभयारण्य, आसाम, पंजाब, कर्नाटक तसेच श्रीलंका येथे हे पक्षी दिसून येतात.
चौकट
पक्षी अभ्यासकांमध्ये महत्त्व
साताऱ्यातील कुमठे तलाव हाही यांचे आश्रयस्थान बनत आहे. कुमठे तलाव हा साताऱ्याच्या दक्षिण-पश्चिम भागाला असून येथे चक्रवाक बदक, शेकाट्या, मूर हेन, शावलर बदक, पांढरा कंकर, काळा कंकर, ऑस्प्रे, पांढऱ्या मानेचा बगळा, सुरय, कंठेरी चिखली या स्थलांतरित पक्ष्यांमुळे पक्षी अभ्यासकांमध्ये या तलावाचे महत्त्व वाढत आहे, अशी माहिती पक्षीअभ्यासक प्रा. सागर कुलकर्णी यांनी दिला.
फोटो ०९सातारा-बर्ड
साताऱ्यातील कुमठे परिसरातील मापरवाडी तलाव परिसरात कृष्णबलक पक्ष्यांचे आगमन झाले आहे.