काळूबाई यात्रेच्या मुख्य दिवशी शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:14+5:302021-02-05T09:12:14+5:30
वाई : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील श्री काळूबाई देवीच्या यात्रेचा गुरुवारी मुख्य दिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या ...

काळूबाई यात्रेच्या मुख्य दिवशी शुकशुकाट
वाई : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील श्री काळूबाई देवीच्या यात्रेचा गुरुवारी मुख्य दिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार ती रद्द करण्यात आली. विश्वस्तांसह निवडक पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत होता.
देवीची मानाची पालखी मांढरदेव गावातून काळूबाई मंदिर परिसरात आणण्यात आली. देवीचा जागर निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला.
गुरुवारी सकाळी देवीचा गोंधळ घालण्यात आला. सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त महेश कुलकर्णी, सी. ए. अतुल दोशी, चंद्रकांत मांढरे, जीवन मांढरे, सुधाकर क्षीरसागर, शैलेंद्र क्षीरसागर, राजगुरू कोचळे, सचिव रामदास खामकर, सचिन चोपडे उपस्थित होते.
मंदिराला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. मांढरदेव परिसरात जमावबंदीचे आदेश दिल्याने पोलीस व प्रशासन योग्य ती खबरदारी घेत होते. मांढरगडावर व काळूबाई मंदिर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी, वाईचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक पोलीस निरीक्षक, दहा उपनिरीक्षक, ८७ पुरुष, २० महिला वाहतूक कर्मचारी, २४ होमगार्ड, १ दंगा काबू पथक, जलद कृती दलाची तुकडी असा बंदोबस्त तैनात केला आहे. मांढरदेवीला येणाऱ्या भाविकांना भोर येथे शिवाजी चौक व वाई एमआयडीसी त्याचबरोबर कोचळेवाडी फाटा येथे अडवून माघारी पाठवले जात आहे.
चौकट :
भाविकांना पुन्हा पाठविले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार यात्रेचे फक्त विधी विश्वस्त, प्रशासनातील अधिकारी व पुजारी अशा ठरावीक लोकांना करण्याची परवानगी आहे. भाविकांना पूर्णपणे बंदी असून वाई औद्योगिक वसाहतीत मांढरदेवी रोडवर असलेल्या छोट्या काळूबाईच्या मंदिरात पूजा, दर्शन व नवस फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती; परंतु पोलिसांनी त्यांना माघारी पाठविले.
फोटो
२८मांढरदेव०१
मांढरगडावरील काळूबाईच्या यात्रेचा गुरुवारी मुख्य दिवस होता. ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यावेळी तहसीलदार रणजित भोसले यांच्या विश्वस्त उपस्थित होते.