श्रीमंत राजेंचे नगरसेवक ‘गरीब’
By Admin | Updated: December 25, 2014 00:04 IST2014-12-24T23:28:02+5:302014-12-25T00:04:27+5:30
महिना उलटला : प्रकाश आमटेंना निधी देण्यासाठी ३९ पैकी केवळ ५ जणांकडूनच रक्कम जमा

श्रीमंत राजेंचे नगरसेवक ‘गरीब’
सातारा : नावामागे ‘श्रीमंत’ बिरुद असणाऱ्या आमदारांनी मनाची श्रीमंती दाखवून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांना त्यांच्या कार्यासाठी भरीव आर्थिक साह्य देण्याचा शब्द दिला खरा; पण ज्यांच्या जिवावर तो दिला, त्या नगरसेवकांनी मात्र निविदा फोडताना दिसणारी तत्परता दाखविली नाही आणि महिना उलटूनसुद्धा ३९ पैकी केवळ सातच जणांनी या कामासाठी नगराध्यक्षांकडे पैसे जमा केले आहेत. यात स्वत: नगराध्यक्ष, एक स्वीकृत आणि एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे.
प्रकाश आमटे यांना २२ नोव्हेंबर रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार पालिकेतर्फे देण्यात आला. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देऊन जमा केलेली ५० हजारांची रक्कम आमटे यांच्या कार्यासाठी देणगी म्हणून त्यांच्या स्वाधीन केली. ‘ही मदत फारच कमी वाटते,’ असे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे आपल्या भाषणात म्हणाले होते, ‘आता नगरसेवकांनीही कसलाच गवगवा न करता आपला खिसा रिकामा करावा.’ काही दिवसांनी रक्कम पाठविली जाईल, असे आश्वासन आमटे यांना देतानाच आमदारांनी नगरसेवकांना साधारणपणे आठवड्यात रक्कम नगराध्यक्षांकडे जमा करावी, अशी सूचना केली होती.
तथापि, महिना होत आला तरी कुणीच रक्कम जमा केली नाही, हे पाहून माजी नगरसेवक शंकर माळवदे यांनी तीन-चार दिवसांपूर्वी एक पत्रक काढले. ‘सातारचे नगरसेवक कसल्याही प्रकारच्या ठेक्यांमध्ये सहभागी नसतात. त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत आणि त्यामुळेच कदाचित सर्व नगरसेवक गरीब असतील. आपण सर्वांनी त्यांना समजून घ्यावे,’ अशा उपहासात्मक शैलीत त्यांनी नगरसेवकांचा समाचार घेतला. माजी सैनिक असणाऱ्या माळवदे यांनी आपल्या पेन्शनमधून पाच हजार रुपये देणार असल्याचे जाहीर करून रक्कम जमाही केली. त्यांच्याबरोबर नगरसेवक निशांत पाटील यांनीही पाच हजार जमा केले. त्यानंतर काही नगरसेवक पुढे सरसावले.
आजपावेतो या दोघांव्यतिरिक्त स्वत: नगराध्यक्ष सचिन सारस, स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक महेश जगताप, जयेंद्र चव्हाण यांनी रक्कम जमा केली आहे. ३९ नगरसेवकांपैकी उर्वरित ३४ जणांनी बुधवारपर्यंत रक्कम जमा केलेली नव्हती.
निविदा फुटण्याच्या वेळी दिसणारी नगरसेवकांची धावपळ अशा वेळी का दिसत नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. प्रभाग निधी नसणाऱ्या स्वीकृत नगरसेवकाने रक्कम जमा केली असताना जनतेतून निवडून आलेले आणि एरवी आमदारांचा शब्द तातडीने झेलण्यासाठी अहमहमिका लावणारे इतर नगरसेवक मात्र महिन्याभरानंतरही हा शब्द झेलायला तयार नाहीत.
नगरसेवकांना इतकी गरिबी कशामुळे आली, याचे उत्तर शोधण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. निवडणुकांमध्ये लाखोंचा खर्च करताना व कार्यकर्ते सांभाळताना खिशाला ढील दिली जाते, ती अशा वेळी मात्र दिली जात नाही. खरे तर ज्यांच्या शब्दाला स्थानिक पातळीवर किंमत असते, त्यांनी एखादे आवाहन केले तरीसुद्धा मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो. मात्र, नेत्यांच्या आदेशानंतरही यावेळी विलंब का लागला, हे कोडेच आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवक होण्यापूर्वीपासूनच मी ‘आनंदवन’मध्ये जाऊन नेहमी श्रमदान केले आहे. त्यामुळे आमटे यांच्या कामाची व्याप्ती मला चांगलीच माहीत आहे. सातारा विकास आघाडीतर्फे निधी संकलनाला सुरुवात केली आहे. मात्र, या हाताने केलेले दान त्या हाताला कळू द्यायचे नाही, ही संस्कृती जोपासून आम्ही आघाडीतर्फे जास्तीत जास्त निधी संकलित करीत आहोत. लवकरच हा निधी सुपूर्द केला जाईल.
- दत्तात्रय बनकर,
प्रतोद, सातारा विकास आघाडी
कोण काय म्हणाले?
फेब्रुवारी महिन्यात प्रकाश आमटे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा साताऱ्याला येणार आहेत. त्याच वेळी त्यांना निधी देण्याचे नियोजन आहे. तोपर्यंत सर्व नगरसेवक नक्कीच रक्कम जमा करतील.
- सचिन सारस,
नगराध्यक्ष
प्रकाश आमटे यांचे कार्य फार मोठे आहे. त्यांच्या कार्याला आपण किती मदत करू शकणार? तरीही हे काम अधिक जोमाने सुरू राहावे, यासाठी आमदारांचा निर्णय जाहीर होताच दहा हजारांची देणगी मी नगराध्यक्षांकडे सुपूर्द केली आहे.
- प्रवीण पाटील,
स्वीकृत नगरसेवक