‘श्रीं’च्या आधी श्रीफळाचे आगमन
By Admin | Updated: August 27, 2014 23:31 IST2014-08-27T21:25:25+5:302014-08-27T23:31:01+5:30
दर वाढले : आगामी काळात आवक आणखी वाढण्याची चिन्हे; ‘चारपट्टा’ला मागणी

‘श्रीं’च्या आधी श्रीफळाचे आगमन
सचिन काकडे - सातारा -दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नारळांची आवक हळूहळू वाढत चालली आहे. उत्सवकाळात नारळाला मोठी मागणी असल्याने काही दिवसांत आवक आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सण, सभारंभात तसेच धार्मिक कार्यासाठी एरवी नारळांची विक्री होतच असते; परंतु गणेशोत्सव व नवरात्रीत नारळाला विशेष महत्त्व प्राप्त होते. दरवर्षी जिल्ह्यामध्ये नारळाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. २९ आॅगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही जिल्ह्यात नारळांची आवक हळूहळू वाढत चालली आहे. जिल्ह्यात राज्यासह आंधप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणांहून नारळाची आवक होते.
गणेशोत्सव काळात नारळापासून मोदकासह विविध खाद्यपदार्थ बनविले जातात. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांपासून गणेशमंडळांपर्यंत सर्वांकडून नारळाची मागणी होत असते. गणरायाला अर्पण करण्यासाठी देखील नागरिकांतून नारळाची मागणी होत असेत.
घरगुती वापरासाठी देखील नारळाचा सतत उपयोग होत असतो. त्यामुळे उत्सवकाळात नारळाची सर्वाधिक आवक होते असते. केवळ सातारा शहरामध्ये उत्सवकाळात २० ट्रक नारळाची विक्री होते.
एका ट्रकमध्ये लहान-मोठे सुमारे १२ ते १३ हजार नारळ असतात. दरवर्षी हे प्रमाण बदलत असते. सध्या नारळाच्या किमती वाढल्या असून, याच्या विक्रीवर काही अंशी परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.