अस्वस्थ कृष्णाकाठ संयम दाखवतोय

By Admin | Updated: January 10, 2017 23:44 IST2017-01-10T23:44:01+5:302017-01-10T23:44:01+5:30

माळवाडी घटना : सोशल मीडियावरून सलोखा टिकविण्यासाठी पुढाकार

Showing restraint to restless Krishna | अस्वस्थ कृष्णाकाठ संयम दाखवतोय

अस्वस्थ कृष्णाकाठ संयम दाखवतोय


शरद जाधव ल्ल भिलवडी
माळवाडी (ता. पलूस) येथील १४ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनेने जिल्ह्यातील भिलवडी-माळवाडीसह कृष्णाकाठ अस्वस्थ बनला आहे. या घटनेचे वृत्त स्थानिकांना समजण्यापूर्वीच काही समाजकंटकांनी सोशल मीडियावरून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्याने सर्वत्र घबराटीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी मात्र संयमाने स्थिती हाताळत पोलिसांना सहकार्य करीत सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वृत्ती वेळीच रोखल्या.
माळवाडीतील संतापजनक घटनेनंतर गावातून कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या नोकरदारांचे दूरध्वनी परिस्थिती जाणून घेण्यासाठी खणाणू लागले. त्यामुळे स्थानिकांची काळजीपोटी अस्वस्थता वाढू लागली. काहींनी माहितीची खातरजमा न करता निष्काळजीपणे पोस्ट व्हायरल केल्या, मात्र यामध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे निदर्शनास आले. घडलेली घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. पोलिसांनी खुन्यांना शोधून कठोरातील कठोर शिक्षा करावी, या मागणीवर सर्वजण ठाम आहेत. मात्र या घटनेचे राजकीय, भावनिक भांडवल न करता संयमाने परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्धार भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, धनगाव, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन परिसरातील गावकऱ्यांनी केला आहे.
पलूस तालुक्यात कृष्णाकाठच्या या गावामध्ये सर्वच जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात आले आहेत. येथील सामाजिक ऐक्य, जातीय सलोखा वाखाणण्याजोगा आहे.
माळवाडीत घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. त्यातच काही समाजकंटकांनी या घटनेचे भांडवल करीत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावरून पसरविल्या. याचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी संयम पाळून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी आणि तपासकामी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला.
परिसरातील गावांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा, कॅँडल मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. आरोपींना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी करीत प्रशासनास निवेदन दिले. पलूस तालुका प्रशासनाने गावागावातील ग्रामपंचायतींमध्ये दक्षता व शांतता कमिटीच्या बैठका घेऊन परिस्थिती हाताळण्याचे आवाहन केले.
जनजीवन पूर्वपदावर... मात्र भीती कायम
भिलवडी परिसरातील सर्व शाळांमध्ये या पीडित मुलीला श्रध्दांजली वाहण्यात आली. शाळा तसेच सर्व परिसर बंद ठेवण्यात आला. रविवारच्या सुटीनंतर सोमवारी सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये पूर्ववत सुरू झाली. गेले दोन-तीन दिवस या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आल्याने व संशयितांची धरपकड सुरू असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे. घटनेबाबत महिला व मुलींमध्ये भीतीदायक वातावरण आहे.
सोशल मीडियावरून सकारात्मक संदेश
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोशल मीडियावरून खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मात्र नेटीझम मंडळी गडबडली आहेत. भिलवडी आणि परिसरातील तरुणांनी सामाजिक सलोखा टिकवत शांततेच्या मार्गाने परिस्थिती हाताळण्याचे सकारात्मक संदेश पाठवले.

Web Title: Showing restraint to restless Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.