झोपाळू कर्मचाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस
By Admin | Updated: April 6, 2016 00:19 IST2016-04-05T22:47:08+5:302016-04-06T00:19:33+5:30
खुर्चीतील वामकुक्षी भोवली : उन्हाळ्याचे गांभीर्य ओळखण्याबाबत अन्य कर्मचाऱ्यांनाही तंबी

झोपाळू कर्मचाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस
सातारा : धोम पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आॅन ड्यूटी वामकुक्षी घेणाऱ्या लिपिकाला या विभागाचे कार्यकारी अभियंता वाय. आर. दाभाडे यांनी मंगळवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. या नोटिसीनुसार उत्तर देण्याची सूचना त्यांनी केली आहे.
सातारा तालुक्यातील जावळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू शेळके यांनी सोमवारी धोम पाटबंधारे विभागाचे प्रथम लिपिक पी. डी. सावंत यांना कार्यालयातील खुर्चीत झोपा काढताना कॅमेराबद्ध केले होते. तब्बल काही मिनिटे खुर्चीवर डुलक्या खातानाचे चित्रीकरणही तब्बल काही मिनिटे केले.याबाबत कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकाऱ्यांकडेही शेळके यांनी तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश धोम पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिले होते. या सर्व प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी कार्यकारी अभियंता दाभाडे यांनी सावंत यांना नोटीस बजावली.दरम्यान, तीव्र उन्हाळा व धरणांतील कमी झालेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनातसेच शेतकऱ्यांनाही पूर्ण माहिती देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता दाभाडे यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन केले. (प्रतिनिधी)
वरिष्ठांच्या सूचनेनुसार लिपिक पी. डी. सावंत यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून या नोटिसीला खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- वाय. आर. दाभाडे, कार्यकारी अभियंता, धोम पाटबंधारे विभाग