‘तोतया शोभा राजपाल’ अटकेत
By Admin | Updated: January 23, 2015 00:37 IST2015-01-22T23:58:01+5:302015-01-23T00:37:05+5:30
गूढ उकलू लागले : पाचगणी बनावट जमीन व्यवहाराचा तुषार खरात सूत्रधार

‘तोतया शोभा राजपाल’ अटकेत
पाचगणी : अभिनेता आमीर खान याचे बंधू मन्सूर नासीर हुसेन खान व अभिनेता संजय दत्तचे वकील सी. बी. वाधवा यांची कन्या शोभा राजकुमार राजपाल यांची भिलार येथील सामायिक जमीन परस्पर विकल्याच्या गुन्ह्याचे गूढ उकलण्यास सुरूवात झाली आहे. या गुन्ह्यातील ‘ती’ तोतया महिला व तीन पुरूष संशयितांना जेरंबद करण्यात पाचगणी पोलिसांना यश आले.तुषार सुधीर खरात हा या प्रकरणाचा ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे स्पष्ट होत आहे.
भिलार येथे मन्सूर खान व शोभा राजपाल यांची एकत्रित जमीन आहे. ती अनेक वर्षे पडिक असल्याचा फायदा घेत तोतया शोभा राजपालने तिची बनावट मुले उभी करून त्यांची खोटी कागदपत्रे जमा करून ही जमीन परस्पर विकल्याचे उघडकीस आले होते. संबधित महिलेने लक्ष्मण भणगे आणि दिलीप गोळे या स्थानिकांना आपले सावज बनवून कमी किमतीत जमिनीचा व्यवहार केला. तलाठ्याच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली. मूळ शोभा राजपाल यांचे चिरंजीव विनायक यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात लक्ष्मण भणगे, दिलीप गोळे, तोतया शोभा राजपाल, वैभव राजपाल, सचिन राजपाल, विशाल गोळे, जय भणगे, अॅड. रामदास माने व महाबळेश्वरच्या तालुका निबंधकांविरुद्ध तक्रार दिली.
पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तपासाची सूत्रे गतिमान केली. दोन दिवसांपूर्वी यातील मुख्य सुत्रधार तुषार खरात (वय २७, मूळ गाव दांडेघर, ता.महाबळेश्वर, सध्या रा. खडकी-पुणे), सचिन गंगाराम वेताळ (वय २६, रा. धानोरी-पुणे) या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतले तर चंद्रकांत शांताराम अहिरे (वय २४, रा. नाशिक) याला नाशिक येथून ताब्यात घेतले होते.
काल रात्री वाईचे उपविभागाीय अधिकारी हुंबरे व भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण येवले, हेड कॉन्स्टेबल सत्यवान बसवत, मुबारक सय्यद, माधुरी दीक्षित यांचे पथक नाशिकला गेले. तोतया शोभा राजपालचे खरे नाव सुनंदा प्रकाश चंद्रमोरे (वय ४५) असल्याचे स्पष्ट झाल्यांनतर या पथकाने मोठ्या शिताफीने तिला टकसाळवाडी, नाशिकातील झोपडपट्टीतून ताब्यात घेतले. ती नाशिकातील न्यायालयात नोकरीस असल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)
कुणाकुणाला घातला गंडा?
‘मास्टरमांइंड’ तुषार खरात हा मूळचा पाचगणीजवळीलच दांडेघरचा असल्याने परिसरातील बरीच माहिती त्याला आहे. मोक्याच्या जागांची माहीती घेऊन त्याने स्थानिक एजंटांना जाळ्यात ओढून सावज हेरले व बनावट दस्तावेजांच्या आधारे त्यांना फसवले.