आशियाई महामार्गावर जीवघेणे ‘शॉर्टकट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:38+5:302021-05-23T04:38:38+5:30
कऱ्हाड : आशियाई महामार्ग ओलांडण्यासाठी छेदरस्ता, पायपूल आहे; पण स्थानिकांनी अनेक ठिकाणी ‘शॉर्टकट’ बनवलेत. संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच ...

आशियाई महामार्गावर जीवघेणे ‘शॉर्टकट’
कऱ्हाड : आशियाई महामार्ग ओलांडण्यासाठी छेदरस्ता, पायपूल आहे; पण स्थानिकांनी अनेक ठिकाणी ‘शॉर्टकट’ बनवलेत. संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच दुभाजकाचे कठडे फोडून स्थानिक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पायी चालत नव्हे, तर चक्क दुचाकी दुभाजकावर चढवून महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न होतोय. हाच जीवघेणा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय.
पुणे-बंगळूर आशियाई महामार्ग छेदरस्त्याशिवाय ओलांडता येऊ नये, यासाठी सातारा व कोल्हापूर लेनच्या मध्यभागी दुभाजक बांधण्यात आले आहेत. तसेच कऱ्हाडनजीक दुभाजकावर संरक्षक जाळीही उभारण्यात आली आहे. मात्र, तरीही कठडे फोडून तसेच संरक्षक जाळीचे लोखंडी रेलींग कापून ‘शॉर्टकट’ बनविण्यात आले आहेत. भुयारी मार्ग, छेदरस्ता, पायपुलाकडे जाण्यासाठी वाढीव प्रवास करावा लागतो. त्यामध्ये वेळ जातो. हे टाळण्यासाठीच असे ‘शॉर्टकट’ बनविण्यात आले आहेत. मात्र, महामार्गावरील हे ‘शॉर्टकट’ अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.
‘शॉर्टकट’मधून अचानक कोणीतरी आडवे येते. त्यावेळी चालकाला वाहन नियंत्रित होत नाही आणि पादचारी, दुचाकीस्वाराला धडक देऊन संबंधित वाहन पुढे मार्गस्थ होते. गत दोन वर्षांत असे शेकडो अपघात घडले आहेत. मात्र, तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडताना दिसतात.
- चौकट
अपघाती ठिकाणे
१) शिवडे फाटा
२) इंदोली फाटा
३) उंब्रज फाटा
४) खोडशी
५) वहागाव
६) कोल्हापूर नाका
७) कोयना वसाहत
८) नांदलापूर फाटा
९) पाचवड फाटा
१०) मालखेड फाटा
- चौकट (फोटो : २२केआरडी०१)
जोडरस्ते बनवले कोणी..?
महामार्गावरून सेवा रस्त्यावर जाण्यासाठी काही अधिकृत जोडरस्ते आहेत. मात्र, महामार्गानजीक अनेक ढाबे, हॉटेल आणि व्यावसायिकांनी अनधिकृतपणे जोडरस्ते बनवलेत. हे जोडरस्तेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
- चौकट
जिल्ह्यातील ‘ब्लॅकस्पॉट’
एकूण : ८४
हायवेवर : ५५
- चौकट
गतवर्षीचे अपघात
जानेवारी : २०
फेब्रुवारी : १३
मार्च : ७
एप्रिल : ३
मे : ७
जून : १
जुलै : १
ऑगस्ट : ३
सप्टेबर : ४
आॅक्टोबर : ४
नोव्हेंबर : ११
डिसेंबर : ०
- चौकट
चार महिन्यांत २६ अपघात
शेंद्रे ते पेठनाका यादरम्यान जानेवारी ते एप्रिल २०२१ मध्ये एकूण २६ अपघात झाले. त्यामध्ये दहाजणांना जीव गमवावा लागला. जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारीमध्ये ५, मार्चमध्ये ६ तर एप्रिलमध्ये ४ अपघात झाले आहेत.
- चौकट (फोटो : २२केआरडी०२)
पायपूल असून अडचण, नसून खोळंबा
कऱ्हाडमध्ये कोल्हापूर नाक्यानजीक महामार्ग ओलांडण्यासाठी पायपूल आहे. मात्र, या पायपुलाचा क्वचितच वापर होतो. बहुतांश नागरिक धोकादायकरित्या शॉर्टकटनेच महामार्ग ओलांडतात.
फोटो : २२केआरडी०३
कॅप्शन : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाची संरक्षक जाळी तोडून तसेच दोन्ही लेनमधील दुभाजकाचा कठडा तोडून धोकादायकरित्या महामार्ग ओलांडला जातो.