सातारा : मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरुन एका मजुराला लाकडी दांडके आणि स्टीलच्या डब्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये मजुराच्या हात आणि पायाला जबर मार लागला आहे. तर याप्रकरणी चाैघांच्या विरोधात शहर पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार शहरातील गोडोली भागात घडला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी नयन सुरेश चव्हाण (सध्या गोडोली, मूळ रा. गुंज, ता. महागाव, जि. यवतमाळ) याने तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार ऋतीक शिंदे (पूर्ण नाव नाही, रा. म्हसके वस्ती गोडोली), रोहन भोसले (पूर्ण नाव नाही रा. बगाडवाडा, गोडोली) आणि अनोळखी दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरुन दि. ३ जुलै रोजी रात्री साडे सातच्या सुमारास नयन चव्हाण याला मारहाण करण्यात आली. यासाठी संशयितांनी लाकडी दांडके आणि स्टीलचा तीन कप्प्याचा डबा वापरला. तसेच मारहाण करुन कापडी फड्याने नयनचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मारहाणीत नयन चव्हण याचा उजवा हात तसेच पायाला गंभीर जखम झाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
Satara: मिरवणुकीत नाचताना धक्का लागला; एका मजुराला दांडक्याने मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
By नितीन काळेल | Updated: August 16, 2023 14:01 IST