कऱ्हाडात अवतरली ‘शिवसृष्टी’
By Admin | Updated: April 21, 2015 01:01 IST2015-04-21T00:45:44+5:302015-04-21T01:01:03+5:30
शिवमूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात : देखाव्यांमधून साकाराले गडकोट

कऱ्हाडात अवतरली ‘शिवसृष्टी’
कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवार, दि. २० रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त कऱ्हाडातही जय्यत तयारी करण्यात आली असल्याने यावर्षीची शिवजयंती सर्वांसाठी पर्वणीची ठरत आहे. शहरातील सार्वजनिक मंडळांकडून महाराष्ट्रातील दुर्मिळ असलेले आकर्षक गडकोट किल्ले यांच्या प्रतीकात्मक प्रतिकृतींच्या देखाव्यांची उभारणी करण्यात आली आहे. या देखाव्यांमुळे कऱ्हाडात शिवसृष्टी अवतरली असल्यासारखे दिसून येत आहे.
शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवरांयांचा सिंहासनावर असलेला देखावा, पाटण कॉलनी श्री शिवाजी गणेश क्रीडा मंडळ व श्री साई दत्त नवरात्र उत्सव मंडळांतर्फे दरबार देखावा, कर्मवीर चौक येथे एका तरुण मंडळातर्फे ‘प्राणी वाचवा’ असा संदेश देणारा देखावा आकर्षक प्रतिकृतीतून उभारला आहे. तर शनिवार पेठ येथेही उभारण्यात आलेला देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. तसेच पोपटभाई पेट्रोल पंप चौक, कोल्हापूर नाका, चावडी चौक, आझाद चौक, पावसकर गल्ली, मंडई परिसर, नूतन मराठी शाळा परिसर, महिला महाविद्यालय, पे्रमलाताई चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर, प्रीतिसंगम बाग परिसर आदी ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे उभारण्यात आले आहेत.
तालुक्यातील १०९ पेक्षा जास्त ठिकाणी तसेच शहरात शंभरपेक्षा जास्त हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून शिवमूर्तींची प्रतिष्ठापना करत आकर्षक देखाव्यांची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासमोरील शिवबा गु्रप मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. शहरतील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या देखाव्याला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. त्यामुळे अत्यंत उठावदार नक्षीकाम करण्यात आलेला व विद्युत रोषणार्इंनी सजवण्यात आलेला देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिवसैनिकांकडून सोमवारी दिवसभर शहरातून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत शिवमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. गडकोट तसेच किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीचे शिवसैनिकांकडून दत्त चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येत होते. (प्रतिनिधी)