शिवसेनेची तलवार म्यान !
By Admin | Updated: April 15, 2015 00:21 IST2015-04-15T00:21:41+5:302015-04-15T00:21:41+5:30
जिल्हा बँक निवडणूक : स्वबळावर लढणार नसल्याची शिवतारेंकडून कबुली

शिवसेनेची तलवार म्यान !
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पॅनेल टाकण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेने अखेर तलवार म्यान केली. शिवसेनेचे आमदार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर लढू शकणार नाही,’ अशी कबुली मंगळवारी
$(दि. १४) पत्रकार परिषदेत दिली; परंतु त्यागीवृत्तीने निवडणूक लढविणाऱ्यांसोबत शिवसेना असेल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
शिवसेना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनेल टाकणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी साताऱ्यात केली होती. मात्र, निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल झाले, तरी अद्याप शिवसेनेची कोणतीच हालचाल दिसली नाही. या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाच्या बैठकीसाठी साताऱ्यात दाखल झालेल्या पालकमंत्री विजय शिवतारे यांना पत्रकारांनी छेडले असता जिल्हा बँक निवडणुकीसाठी कोणतीही तयारी नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री म्हणाले,‘जिल्हा बँकेची निवडणूक ही संस्थांत्मक निवडणूक असते. शिवसेना पूर्वी एकदा सत्तेवर आली असताना आम्ही अनेक उपसा सिंचन योजना जिल्ह्यामध्ये राबविल्या; परंतु या योजनांची प्रसिद्धी करूशकलो नाही. संस्थांत्मक काम करण्यातही आम्ही रस घेतला नाही.’
सत्ताधाऱ्यांविरोधात पॅनेल उभे करण्यासाठी आपल्याकडे कोणीच आले नसताना ‘बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना’ या म्हणीप्रमाणे अवस्था होऊ नये, यासाठी काहीच हालचाली केल्या नसल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. मालेगाव सहकारी साखर कारखाना पवारांच्या ताब्यातून आम्ही खेचून घेतला. चंद्रराव तावरे हे कारखान्याच्या निवडणुकीत शेलार मामांसारखे नि:स्वार्थी भूमिकेने निवडणुकीत काम करीत असल्याची स्तुतिसुमनेही शिवतारे यांनी उधळली.
$‘दौंड’ फायद्यात तर ‘सोमेश्वर’ तोट्यात कसा?
दौंड येथील सहकारी कारखाना मोडीत काढून तो‘ दौंड शुगर’ या नावाने चालविला जात आहे. अजित पवारांच्या ताब्यात असणारा दौंड शुगर हा खासगी कारखाना १२७ कोटी रुपये फायद्यात आहे. त्यांच्याच ताब्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर १२६ कोटी रुपयांचे कर्ज आहे. साखर निर्मितीसाठी लागणारा खर्च तेवढाच, साखरेचा दर तोच, उसाला द्यावा लागणारा खर्चही तेवढाच, मग खासगी कारखाना फायद्यात आणि सहकारी कारखाना तोट्यात कसा? सहकारी कारखाने मोडीत काढून त्यांच्यावर मालकी गाजविण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केला.
प्रस्थापितांच्या दहशतीमुळे विरोध नाही !
काँगे्रस-राष्ट्रवादीने गेल्या अनेक वर्षांत येथील सहकारी संस्था आपल्याखाली दाबून ठेवल्या आहेत. २५ वर्षांपासून विकास सेवा सोसायट्यांमध्ये तेच-तेच पदाधिकारी निवडून येतात. कुणी विरोध केला, तर त्याचा ऊस कारखान्याला न्यायचा नाही. दूध बंद करायचे, कर्ज नवं-जुणं करून दिलं जात नाही. प्रस्थापितांच्या अशा दहशतीमुळे ग्रामीण भागामध्ये विरोध होत नाही. बँक निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघांतून एका संचालकाला ठराव करून मतदानाचा अधिकार दिला जातो. हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे सहकारातील मतदानाची पद्धत पहिल्यांदा बदलावी लागेल, त्यादृष्टीने आमचे सरकार प्रयत्न करेल.