शिवसेनेचा ‘जॅकपॉट’ कुणाकुणाला?
By Admin | Updated: September 16, 2014 23:29 IST2014-09-16T22:28:57+5:302014-09-16T23:29:58+5:30
जागावाटपाची प्रतीक्षा : स्वबळाची घोषणा झाल्यास प्रत्येक मतदारसंघात इच्छुक दबा धरून

शिवसेनेचा ‘जॅकपॉट’ कुणाकुणाला?
राजीव मुळ्ये - सातारा -शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून वरिष्ठ पातळीवर अजून समझोता झालेला नाही. ‘युती’ची ‘महायुती’ झाल्याने जागावाटप आणखी जटिल बनले आहे. जागावाटप गुण्यागोविंदाने झाल्यास शिवसेनेला कोणकोणत्या जागा सुटतील आणि तेथे उमेदवारीचा ‘जॅकपॉट’ कुणाकुणाला लागेल, याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
शिवसेनेचे तिकीट कोणाला, या प्रश्नाला दोन पर्याय प्रत्येक मतदारसंघातून येत आहेत. एक म्हणजे स्वबळावर लढल्यास तिकीट कुणाला आणि जागावाटपाचे जुळल्यास कुणाला? लोकसभा निवडणुकीतील अनुभवांनंतर वरिष्ठ पातळीवर जशी पक्षांतराची लाट आली, तशीच स्थानिक पातळीवरही आली. अनेकांनी काँग्रेस आघाडीतून शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेला इच्छुक असल्याचे दाखवून देणे हाच पक्षांतरांमागचा मुख्य हेतू! परंतु इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतानाच वरिष्ठ पातळीवरच जागावाटपाचा निर्णय खोळंबला असून सर्वांचाच रक्तदाब वाढला आहे.
शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवावी, असे म्हणणारा कार्यकर्त्यांचा वर्ग सातारा जिल्ह्यातही काही कमी नाही. तशी वेळ आल्यास प्रत्येक मतदारसंघात इच्छुक दबा धरून आहेत. कोरेगावातून हणमंत चवरे आणि दिनेश बर्गे इच्छुक आहेत. साताऱ्यातून नरेंद्र पाटील, राजेंद्र कुंभारदरे यांच्याबरोबरच आम आदमी पक्षाचा झाडू टाकून धनुष्यबाण हाती घेतलेले राजेंद्र चोरगेही रांगेत आहेत.
पाटणमध्ये शंभूराज देसार्इंव्यतिरिक्त आणखी कोणीच इच्छुक नाही आणि असलाच तरी त्याची डाळ शिजणे शक्य नाही. युती होवो वा स्वबळावर निवडणूक होवो, शंभूराज आखाड्यात असणारच! ‘कऱ्हाड दक्षिण’मधून संजय मोहिते तर ‘कऱ्हाड उत्तर’मधून पृथ्वी शिरगावकर इच्छुक आहेत. वाई मतदारसंघात डी. एम. बावळेकर शिवसेनेच्या तिकिटाचे प्रमुख दावेदार मानले जात असले, तरी स्वबळावर लढायचे झाल्यास दगडू सपकाळ यांना तिकीट द्यावे, अशी मागणी करणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. याखेरीज महेश शिंदे आणि नंदकुमार घाडगेही वाईतून इच्छुक आहेत. माणमधून धनाजी सावंत, तर फलटणमधून माजी आमदार बाबुराव माने इच्छुक आहेत.