शिवस्मारक पराक्रमाच्या ठिकाणी; वेगळा विदर्भ नको

By Admin | Updated: January 19, 2015 00:21 IST2015-01-18T22:37:34+5:302015-01-19T00:21:15+5:30

संभाजीराव भिडे : धारातीर्थ यात्रेचा समारोप; साताऱ्यात भगवे वातावरण, २५ हजारांवर धारकऱ्यांची उपस्थिती

Shivsammar's place of strength; No separate Vidarbha | शिवस्मारक पराक्रमाच्या ठिकाणी; वेगळा विदर्भ नको

शिवस्मारक पराक्रमाच्या ठिकाणी; वेगळा विदर्भ नको

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात न करता ते शिवरायांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले, पराक्रम केला, त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ करण्यास आमचा ठाम विरोध राहील,’ असा इशारा श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी रविवारी दिला.
येथील गांधी मैदानावर श्री वैराटगड ते श्री सप्तर्षीगड (अजिंक्यतारा) या २९ व्या धारातीर्थ यात्रेचा (मोहीम) समारोप झाला. यावेळी उपस्थित असलेल्या २५ हजारांहून अधिक धारकऱ्यांसमोर ते बोलत होते.
यावेळी सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार शंभूराज देसाई, खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर, मिरजचे आमदार सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, शिरोळचे आमदार उल्हास पाटील, हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कल्पनाराजे भोसले आदी उपस्थित होेते.
भिडे म्हणाले, ‘गडकोट, किल्ले यांचे आपले जुने व अनोखे नाते आहे. छ. शिवरायांनी स्वत: किल्ले बांधले. सध्या गडकोट, किल्ल्यांची स्थिती भयानक आहे. छ. शिवराय व संभाजी महाराज हे आपले महामृत्युंजय मंत्र आहेत. छ. शिवरायांचे स्मारक उभे करायचे झाल्यास ते ज्या गड-किल्ल्यावर त्यांनी वास्तव्य केले, पराक्रम केला, त्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. हे स्मारक समुद्रात होऊ नये. त्याचबरोबर महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ करण्याचे कारस्थान सुरू आहे. पण, आमचा वेगळ्या विदर्भाला हा ठाम विरोध राहणारच आहे. महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होणे कधीही शक्य नाही.’
पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘छ. शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे राज्य आम्ही घडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. शिवरायांच्या विचाराला कोठे कमीपणा येईल,असे काम आम्ही करणार नाही.’
कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, ‘मागील २९ वर्षांपासून धारातीर्थ मोहीम सुरू आहे. यापाठीमागे संभाजीराव भिडे यांचे मोठे योगदान आहे. छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची त्यांनी जपणूक केली आहे. मात्र, राजकर्ते हे शिवरायांचे नाव घेतात; पण त्या विरोधात कामे करतात. आज गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. त्याची डागडुजी होणे महत्त्वाचे आहे. पालकमंत्री शिवतारे यांनी खऱ्या अर्थाने पालकत्व निभावून गड-किल्ल्यांची दुरवस्था थांबवावी,’ असेही त्या म्हणाल्या.
यावेळी अशोकराव वीरकर, देवदत्त राजोपाध्ये, नितीन चौगुले, प्रदीप बाफना यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले हजारो धारकरी गांधी मैदानावर
उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी स्वागत केले. बाळासाहेब बेडगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

स्वागत कमानी..
भगवे फेटे...
धारातीर्थ मोहिमेचा समारोप सातारा शहरात होणार असल्याने संपूर्ण शहर भगवे झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. जागोजागी रांगोळी काढण्यात आली. धारकऱ्यांची नगरप्रदक्षिणा जाईल त्या ठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात येत होते. गांधी मैदानावर धारकरी बसले होते. मोठ्या संख्येने त्यांनी भगवे फ

ेटे घातले होते. त्यामुळे संपूर्ण मैदान भगव्या फेट्यांनी भरून गेल्याचे दिसत होते


मोहिमेचे २९ वे वर्ष
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी धारातीर्थ यात्रा (मोहीम) काढण्यात येते. यात्रेचे यंदाचे हे २९ वे वर्ष आहे. यावर्षी दि. १५ ते १८ जानेवारीदरम्यान ही यात्रा झाली. दि. १५ रोजी वाई येथून या मोहिमेला सुरुवात झाली. दि. १७ रोजी सायंकाळी यात्रा सप्तर्षीगड (अजिंक्यतारा) येथे मुक्कामासाठी पोहोचली. त्यानंतर दि. १८ रोजी सकाळी अजिंक्यताऱ्यावर श्री मंगळाईदेवीची पूजा करून समारोपाची सुरुवात झाली. पोवई नाक्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.

Web Title: Shivsammar's place of strength; No separate Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.