शिवघराण्याचा पुरस्कार गौरवास्पद : अमिताभ
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-02-29T23:02:30+5:302016-03-01T00:10:39+5:30
मुंबईत चर्चा : जीवन गौरव पुरस्कारासाठी संयोजकांची भेट

शिवघराण्याचा पुरस्कार गौरवास्पद : अमिताभ
सातारा : ज्या मातीत, ज्या राज्यात मी घडलो, त्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या वंशजांकडून दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मला आनंदच होईल, अशा शब्दांत महानायक अमिताभ बच्चन यांनी भावना व्यक्त केल्या.
सातारच्या शिवघराण्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना सातारा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा सातारा जीवन गौरव पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर संयोजकांकडून पंकज चव्हाण इतर काही सातारकरांनी मुंबई अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.
साताऱ्याच्या शिव घराण्यातर्फे देण्यात येणारा पुरस्कार माझ्यासाठी नक्कीच आनंदाचा असेल, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. मात्र, सध्या त्यांच्या आरोग्याबाबत डॉक्टरांनी प्रवास न करण्याबाबतच्या सूचनेमुळे साताराऐवजी मुंबईतच हा पुरस्कार घेता येईल का, याबाबत त्यांनी संयोजकांशी चर्चा केली.
दरम्यान, राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले व दमयंतीराजे भोसले यांनी हा शानदार कार्यक्रम साताऱ्यातच व्हावा, अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर डॉक्टरांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)