मुनावळे जलपर्यटनासाठी शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; इतरांनी श्रेय घेऊ नये - राजू भोसले

By नितीन काळेल | Published: March 8, 2024 07:11 PM2024-03-08T19:11:05+5:302024-03-08T19:13:06+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, शनिवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन

Shivendraraje bhosle pursuit of Munawale cruises; Others should not take credit says Raju Bhosale | मुनावळे जलपर्यटनासाठी शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; इतरांनी श्रेय घेऊ नये - राजू भोसले

मुनावळे जलपर्यटनासाठी शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; इतरांनी श्रेय घेऊ नये - राजू भोसले

सातारा : मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असून याचा आनंदच आहे. पण, यासाठी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यामुळे या प्रकल्पाचे श्रेय दुसऱ्या कोणी घेऊ नये, असा सल्ला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी दिला आहे.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भोसले बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह जावळी तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.

राजू भोसले म्हणाले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दूरदृष्टी होती. पर्यटनातूनच जावळी तालुक्यात समृध्दी येईल. तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होईल हे माहीत होते. त्यामुळेच त्यांनी मुनावळे जलपर्यटनासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला होता. यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेही योगदान लाभलेले. शनिवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. याबद्दल आनंदच वाटतोय. या प्रकल्पात स्थानिक ग्रामस्थांनाही सहभागी करुण घेण्याची गरज आहे. तरच त्यांना रोजगार उपलब्ध होईल. यासाठी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे.

जिल्हा बॅंक संचालक रांजणे म्हणाले, कोयना खोऱ्यातील ८० टक्के जनता ही मुंबई तसेच इतर ठिकाणी पोट भरण्यासाठी गेलेली आहे. त्यांना मुनावळेसह इतर प्रकल्पांच्या माध्यमातून गावाकडे आणण्याचा प्रयत्न आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातूनही जावळी तालुक्यात रस्ते तसेच विविध विकासकामे होत आहेत.

Web Title: Shivendraraje bhosle pursuit of Munawale cruises; Others should not take credit says Raju Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.