शिवेंद्रसिंहराजे अध्यक्षपदी
By Admin | Updated: May 14, 2015 23:54 IST2015-05-14T23:44:18+5:302015-05-14T23:54:46+5:30
जिल्हा बँक : उपाध्यक्षपदी सुनील माने; एका वर्षानंतर खांदेपालट : रामराजे

शिवेंद्रसिंहराजे अध्यक्षपदी
सातारा : ‘जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची वर्णी लागली आहे.
ही निवड निश्चित कालावधीसाठी नसली तरी एका वर्षानंतर पदाधिकारी बदल होऊ शकतो, असे सूतोवाच विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पदाधिकारी निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केले. विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा बँक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी दोघांनाही (पान ८ वर) गुरुवारी नियुक्तीचे पत्र दिले. या निवडीनंतर बँकेचे संचालक आमदार प्रभाकर घार्गे यांनी दोघांचाही सत्कार केला. बँकेमध्ये दोघांच्याही समर्थकांची मोठी रीघ लागली होती. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या दालनात येऊन कार्यकर्ते दोघांचा सत्कार करत होते. अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले व उपाध्यक्ष सुनील माने यांनी पोवई नाक्यावरील शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, किसन वीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, बँकेचे पदाधिकारी निवडीबाबत गुरुवारी सकाळी रामराजे नाईक-निंंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, दादाराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सुनील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.