शिवेंद्रराजेंच्या आईसाहेब आज हव्या होत्या!
By Admin | Updated: May 14, 2015 23:56 IST2015-05-14T22:43:20+5:302015-05-14T23:56:02+5:30
कार्यकर्त्यांना हुंदका : सुरुचीवर अध्यक्षपदाच्या आनंदाला आठवणीची झालर

शिवेंद्रराजेंच्या आईसाहेब आज हव्या होत्या!
सातारा : शिवेंद्रसिंहराजेंनी नेहमी अजिंक्य राहावं, दिवंगत अभयसिंहराजेंच्या विकासाचा वारसा पुढे न्यावा, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंच्या आईसाहेब अरुणाराजे भोसले आज हव्या होत्या, अशी सल सुरुची वर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दाटून आली होती. दिवंगत अभयसिंहराजेंच्या राजकीय वाटचालीत अरुणाराजेंचा मोठा पाठिंबा होता. अजिंक्यतारा उद्योग समूहाच्या स्थापनेपासून या उद्योगाचे जाळे निर्माण केले जात असताना अरुणाराजे साक्षीदार होत्या. अभयसिंहराजेंच्या निधनानंतर कवळ्या वयातील शिवेंद्रसिंहराजेंना त्यांनीच तर धीर दिला. राजकारणाची वाट मळलेली नसताना या वाटेवरून चालण्याचे धाडस त्यांनीच दिले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात दिवंगत अभयसिंहराजेंचे निर्विवाद वर्चस्व होते. हेच वर्चस्व शिवेंद्रसिंहराजेंनीही निर्माण करावे, अशी अरुणाराजेंची सुप्त इच्छा होती. आपल्या मुलाने कायमच अजिंक्य राहावे, अशी मनिषा त्या बाळगून होत्या. आपल्या आईची ही इच्छा शिवेंद्रसिंहराजेंनी दिगंत कीर्ती निर्माण करून कायम पूर्ण केली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी कायमच अजिंक्यपद राखले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यासह इतर संस्थांमध्ये राजकारण येऊ नये, यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. सर्व संस्थांचा कारभार त्यांनी धीरोदात्ततेनं सांभाळला. बँकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याची २४ एप्रिल ही अंतिम तारीख होती. शिवेंद्रसिंहराजे बिनविरोध निवडून आले. गुलालाने माखलेल्या कपड्यांसह शिवेंद्रसिंहराजे आईसाहेबांचा आशीर्वाद घ्यायला सुरुचीवर गेले. अरुणाराजे त्यावेळी व्याधीने ग्रस्त होत्या. तरीही आपल्या चिरंजीवाला आशीर्वाद देण्यासाठी त्या वाट पाहत होत्या. त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला होता. वर्षानुवर्षे मनाच्या एका कप्प्यात जे स्वप्न साठवलं होतं. ते पाहण्याचा समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना उपस्थितांनी पाहिलं. थरथरत्या हातानेच त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंचे औंक्षण केले. (प्रतिनिधी)
हुंदके अन् यशाचा आनंद
सुरुचीवर आठवणींची झालर पसरली होती. शिवेंद्रसिंहराजेंच्या यशाचा आनंद व्यक्त होत होता, त्याचसोबत कार्यकर्त्यांच्या कंठात हुंदकाही दाटला होता.
लखोटा केव्हाच बंद झाला!
‘त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे बंद लखोटा निर्माण केला होता. असली कुठलीही बंद लखोटापद्धती राष्ट्रवादीत नाही. आमच्या दृष्टीने हा बंद लखोटा केव्हाच बंद झाला आहे,’ अशी टीका विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पदाधिकारी निवडीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव पाटील, बँकेचे नूतन अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर, दादाराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील, राजेश पाटील-वाठारकर, अनिल देसाई, सुरेखा पाटील, कांचन साळुंखे, दत्तानाना ढमाळ, अर्जुन खाडे, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप धरू, भुजंगराव जाधव व बँकेचे इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
जिल्हा बँक पदाधिकारी निवडी बारामतीच्या बंद लखोट्यातून झाल्या की साताऱ्यातून, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना बँकेचे नूतन अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘पक्षाचे अध्यक्ष या नात्याने कुठलाही निर्णय घेताना शरद पवार यांना माहिती दिली जाते. येणाऱ्या अडचणींमध्ये त्यांचे मोठे सहकार्य असते. रामराजे-लक्ष्मणतात्या व आम्ही सर्व मिळून कुठलाही निर्णय घेत असतो. त्यासाठी कुठल्याही लखोट्याची कधी गरज पडली नाही.’
दरम्यान, रामराजेंनी माईक ताब्यात घेऊन ‘बंद लखोटा पद्धत कधी नव्हतीच. त्यांच्या (उदयनराजेंच्या) मनातील हा बंद लखोटा आहे. तो वास्तवातला नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा बंद लखोटा आता केव्हाच बंद झालेला आहे,’ असे सांगून बंद लखोटा पद्धतीचा इन्कार केला.
दरम्यान, उदयनराजेंना बँकेच्या कार्यकारी समितीमध्ये घेतले जाणार का?, या प्रश्नावर उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सहकारातील ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार नवीन समित्या निर्माण करता येतात. अजून समित्यांच्या निवडी व्हायच्या आहेत. संचालक मंडळ एकत्र बसून याबाबत निर्णय घेईल. जे निर्णय होतील, ते तुम्हाला सांगितले जाईल,’ असे स्पष्ट केले.