पुळकोटी येथे कृषी पदवीधरांची शिवारफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST2021-02-08T04:33:37+5:302021-02-08T04:33:37+5:30
कुकुडवाड : मौजे पुळकोटी येथील प्रगतशील शेतकरी मंदाकिनी अरुण सावंत यांच्या शेतीला परिसरातील कृषी पदवीधरांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ...

पुळकोटी येथे कृषी पदवीधरांची शिवारफेरी
कुकुडवाड : मौजे पुळकोटी येथील प्रगतशील शेतकरी मंदाकिनी अरुण सावंत यांच्या शेतीला परिसरातील कृषी पदवीधरांनी नुकतीच भेट दिली. यावेळी नावीन्यपूर्ण शेती व्यवस्थापनाबद्दल मंदाकिनी सावंत यांचा सन्मान करण्यात आला.
दुष्काळी माण तालुक्यातील पुळकोटी हे छोटंसं गाव. या गावातील प्रगतशील महिला शेतकरी व गावच्या सरपंच मंदाकिनी अरुण सावंत यांनी स्वतःची शेती नवीन तंत्रज्ञानयुक्त अशी केली असून, शेतात नवनवीन प्रयोग केलेले आहेत. मंदाकिनी सावंत यांचे पती अरुण सावंत हे राज्य शासकीय सेवेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय बडेजाव बाजूला ठेवून मंदाकिनी सावंत यांनी शेती व गावाशी नाळ घट्ट स्वरुपात ठेवलेली आहे. मंदाकिनी सावंत यांच्या आदर्श शेती व्यवस्थापनाला अतिरिक्त जिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, कृषीरत्न प्रा. विश्वंभर बाबर, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार चव्हाण, प्रा. तुकाराम माने, गुलाब सावंत या कृषी पदवीधरांनी भेट दिली. यावेळी विजय सावंत, तात्यासाहेब औताडे, संजय सावंत, आकाश वीरकर, भरत सावंत, सुभाष वीरकर तसेच परिसरातील प्रमुख पुरुष व महिला मान्यवर उपस्थित होते.
शेती पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तयार केलेले शेततळे, त्यातील मत्स्यपालन याबद्दल कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी समाधान व्यक्त केले. तर, मंदाकिनी सावंत यांची शेती दुष्काळी माण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचा आदर्श नमुना असल्याचे प्रा. विश्वंभर बाबर यांनी सांगितले.