शिवसेनेचा नवा कारभारी निष्ठावंत की ‘आयात’
By Admin | Updated: May 26, 2014 01:19 IST2014-05-26T00:56:03+5:302014-05-26T01:19:21+5:30
‘मातोश्री’वर फिल्डींग : जिल्हाप्रमुखपदी कोणाची लागणार वर्णी

शिवसेनेचा नवा कारभारी निष्ठावंत की ‘आयात’
सातारा : सातारा जिल्हा शिवसेना गेले दोन महिने जिल्हाप्रमुखाविना हेलखावे खात आहे. जिल्हाप्रमुखपदी कोण विराजमान होणार हे अजून निश्चित नाही. मात्र, विद्यमान पदाधिकारी जिल्हाप्रमुख असल्याच्या थाटात वावरत आहेत. जिल्हाप्रमुख पदासाठी अनेकांनी थेट ‘मातोश्री’वर फिल्डींग लावली असून यामध्ये पाचजण आघाडीवर आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुखपद निवडीचे फक्त प्रयोग करत असल्याची शिवसैनिकांची तक्रार आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख कोणाला दिले तरी चालेल मात्र, तो निष्ठावंत असावा. इतर कोणत्याही पक्षातून आयात केलेला नसावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही जिल्हाप्रमुख निवडीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. जिल्हाप्रमुख कोण असेल, हे शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेच ठरवणार असलेतरी जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार बाबुराव माने यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी माने यांच्याशी असणारा संपर्क वाढविला आहे. इच्छुकांमध्ये हणमंत चवरे, चंद्रकांत जाधव, संजय माहिते, दत्ताजी बर्गे आणि महेश शिंदे यांचा समावेश आहे. मात्र, सध्यातरी चंद्रकांत जाधव आणि हणमंत चवरे या दोघांपैकी कोणा एकाची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंडखोरी करुन अपक्ष म्हणून लढलेल्या पुरुषोत्तम जाधव यांचा पत्ता यापूर्वीच कट झाला आहे, त्यामुळे पुन्हा त्यांना संधी मिळेल, याची शाश्वती नाही. संजय मोहिते आणि दत्ताजी बर्गे यांच्यावरही मर्यादा येत आहेत. मोहितेंचा वावर कºहाड सोडून आणि बर्गेंचा वावर कोरेगाव शहर सोडून कधी बाहेर दिसलाच नाही. महेश शिंदेही जिल्ह्यात कधी फारसे चमकलेच नाहीत. शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पद नेहमीच अस्थिर राहिले. कधी स्वतंत्र जिल्हाप्रमुख तर कधी लोकसभा मतदारसंघनिहाय पदांची निर्मिती केली. कालांतराने यात बदल करून खैरात वाटल्याप्रमाणे तीन विधानसभा मतदारसंघात एक असे जिल्हाप्रमुख पद निर्माण केले. वर्षभर हा कार्यभार सुरू होता. शिवसेनेच्या अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या जागर मेळाव्यात घडलेल्या प्रकरणामुळे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. बरखास्त करण्यात आलेल्या कार्यकारिणीत पुरुषोत्तम जाधव, हणमंत चवरे आणि संजय मोहिते हे तीन जिल्हाप्रमुख होते. त्याचबरोबर काही उपजिल्हाप्रमुखही होते. सातारा जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना अनेकदा ‘आयात’ जिल्हाप्रमुखांचाच आदेश मानावा लागला आहे. दीपक पवार, पुरुषोत्तम जाधव हे लगेच पक्षात आले आणि जिल्हाप्रमुख झाले ही बाब निष्ठावंत शिवसैनिकांना नेहमीच खटकली. त्यामुळे निदान यावेळी तरी ‘आयात’ जिल्हाप्रमुख निष्ठावंत शिवसैनिकांना नको आहे. दरम्यान, सातारा जिल्हाप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (प्रतिनिधी)